अलिबागमध्येच होणार अँजिओग्राफी, कॅन्सरचे निदान
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रक्तवाहिनीतील रक्ताच्या गुठल्या, हृदयाच्या आजाराचे अथवा कॅन्सर किंवा पोटातील आजारासाठी, त्याचे निदान करण्यासाठी सुविधा रायगड जिल्ह्यात उपलब्ध नव्हती. त्यासाठी रुग्णाला मुंबई, पुणे शहरात जाऊन हजारो रुपये खर्च करावे लागायचे. त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीदेखील वाया जात होते. मात्र, आता अँजिओग्राफी किंवा कॅन्सरचे निदान रायगड जिल्ह्यातच अलिबागमध्ये होऊ शकणार आहे. अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात या आजाराचे निदान करता यावे यासाठी आरसीएफच्या माध्यमातून कॉन्ट्रास्ट प्रेशर इंजेक्टर यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.
गरीब रुग्णाला कॅन्सर झाला तर खासगी रुग्णालयातील उपचार परवडत नसल्याने अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागतात. हा सर्व प्रकार लक्षात घेता रुग्णांना दिलासा देण्यासाठी आरसीएफ कंपनीने सहा लाखांची कॉन्ट्रास्ट प्रेशर इंजेक्टर मशीन जिल्हा सामान्य रुग्णालयाला दिली आहे.
कर्मचार्यांना प्रशिक्षण
ही मशीन चालवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील क्ष किरण विभागातील चार जणांना जेजे रुग्णालय मुंबई येथे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे प्रशिक्षित कर्मचारीही उपलब्ध आहेत. मशीन लोकार्पण सोहळ्याला यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अधिष्ठाता महेंद्र कुरा, उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गवई, क्ष किरण विभागप्रमुख सुहास ढेकणे, आरसीएफ जनसंपर्क अधिकारी संतोष वझे उपस्थित होते.
सर्वसामान्यांच्या आवाक्यात उपचार
सिटी स्कॅनच्या माध्यमातून रुग्णाला या मशीनद्वारे इंजेक्शन देऊन त्याच्या आजाराचे निदान काही वेळातच कळणार आहे. त्यामुळे पुढील उपचार हे त्या रुग्णाला त्वरित मिळणार आहेत. रायगडात खासगी रुग्णालयात ही सुविधा काही प्रमाणात असली तरी ती खर्चिक असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. मात्र, जिल्हा सामान्य रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध झाल्याने चारशे ते आठशे रुपयांत अत्यल्प दरात आजाराचे निदान होणार आहे.