। खांब-रोहे । वार्ताहर ।
दिवसेदिवस उन्हाच्या झळा अतिशय तीव्र होत चालल्याने सर्वजण हैराण झाले आहेत. तर इतर पशूपक्षीही उन्हाच्या तडाख्याने चांगलेच कासावीस झाले आहेत. मागील कित्येक वर्षांच्या मानाने या वर्षी मात्र सर्वत्र तापमानात मोठीच वाढ झाल्याने सर्वांनाच या वाढत्या तापमानाचा सामना करावा लागत आहे. पशू पक्षीही दुपारच्या सुमारास झाडांच्या सावलीचा आधार घेत आहेत तसेच मनसोक्तपणे पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत आहेत.
वाढत जाणार्या तीव्र उष्णतेचाही दैनंदिन जनजीवनावरही चांगलाच परिणाम जाणवू लागल्याने स.10 ते सायं. 4 वा.पर्यन्त उष्णतेचे चटके सहन करावे लागत आहेत. मानवासह इतरही जीवसृष्टी वाढत्या तापमानवाढीमुळे चांगलेच हैराण झाले असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येत आहे. अद्याप पावसाळा सुरू व्हायला सुमारे दीड महिन्याचा कालावधी आहे.त्यानंतर मात्र वातावरणात गारवा निर्माण होईल.तोपर्यन्त प्रखर उष्णतेचा सामना हा प्रत्येकाला करावा लागेल.अशा परिस्थितीत वाढत्या उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रखर ऊन्हात फिरू नये,जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करणे,शिळेपाके अन्न खाऊ नये,पुरेशी झोप घेणे ,थकवा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आदी नियम प्रत्येकाने पाळणे गरजेचे असल्याचे आपले मत येथील तज्ञ डॉक्टर महेंद्र म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.







