| उल्हासनगर | वृत्तसंस्था |
बिस्किटे उत्पादनाची प्रक्रिया सुरू असतानाच उल्हासनगरातील दाल्शन फूड कंपनीत उसळलेल्या आगडोंबित कंपनी जळून खाक झाल्याची घटना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यावेळी 50 कामगारांनी जीव वाचवण्यासाठी कंपनीच्या बाहेर धाव घेतल्याने जीवितहानी टळली आहे. कॅम्प नंबर 4 मधील बाबा प्राईम जवळ दाल्शन फूड कंपनी असून कामगार सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास बिस्किटे उत्पादनाचे काम करत असताना अचानक आग लागली. कामगार जिवाच्या आकांताने बाहेर पडले. आगीने रुद्र रूप धारण केले. ही माहिती समजताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाला फोन करून कळवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही तास शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या आगीत कंपनीतील यंत्रसामग्री व तयार बिस्कीटांचा मोठा साठा भस्मसात झाला आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपास सुरू आहे.