। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
निलेश बुकटे हे नावडे येथे सहाय्यक अभियंता म्हणून काम करत आहेत. 15 जानेवारी रोजी ते नावडा शाखेतील गावांमध्ये थकीत वीज बिल वसुलीसाठी कर्मचार्यांसोबत गेले होते. यादरम्यान, गुरुनाथ धोंगडे यांच्याकडे गेले असता त्यांच्या मीटरमधून वीज चोरी होत असल्याचे महावितरणच्या कर्मचार्यांच्या निदर्शनास आले. गुरूनाथ धोंगडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी निलेश बुकटे हे सायंकाळी सव्वाचार वाजताच्या सुमारास कर्मचार्यांना सोबत घेऊन पुन्हा गेले आणि चोरीबाबत पंचनामा केला. त्यावेळी गुरुनाथ धोंगडे यांनी त्यांना शिवेगाळ केली व अंगावर धावून आले. त्यानंतर धोंगडे यांनी धक्काबुक्की केली आणि हातातील पंचनामा देखील हिसकावून घेऊन तो फाडला. याप्रकरणी गुरुनाथ धोंगडे यांच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.