| नवीन पनवेल । वार्ताहर ।
डॉल्बीच्या दणदणाटावर निर्बंध आल्यानंतर यंदाही गणरायाच्या आगमनासाठी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली जात आहे. त्यामुळे यंदाच्या उत्सवात ढोल-ताशाचा दणदणाट पाहायला मिळणार आहे. दरम्यान, गणेशोत्सव जवळ आल्याने ढोल-ताशा पथकांचा सराव अंतिम टप्प्यात आला आहे. ताल व लयबद्ध वादनाने ही पदके सगळ्यांनाच थिरकायला लावत आहेत. पनवेल परिसरात उड्डाणपुलाखाली अनेक ठिकाणी चौकाचौकांत मोकळ्या जागेवर ढोल-ताशा पथकांचा जोरदार सराव सुरू आहे.
सध्या गणपतीसाठी नवीन लय, ठेका व ताल शिकण्यासाठी बहुतांश ढोल-ताशा पथकातील तरुणाई सध्या सरावातून मेहनत घेत आहे. गणेश उत्सवानिमित्त जवळपास दीड महिना आधीपासून सराव सुरू आहे. नियमित पथकातील सदस्यांचा दिनक्रम पूर्ण करून सायंकाळी सहा ते नऊ या वेळेस सराव चालतो, पथकात साधारण आठ वर्षे वयोगटापासून ते 45 वर्ष वयोगटापेक्षा शंभर ते दोनशेपेक्षा अधिक सदस्यांचा सहभाग असतो. काही पथक सदस्याकडून शुल्क घेतात, तर काही घेत नाहीत, सध्या तरुणाईचा ढोल-ताशा मंडळांमध्ये सहभाग होण्यासाठी मोठा उत्साह दिसत आहे. यासाठी मुलाखतही घेतली जाते, यात एक ते पाच असे पारंपरिक ताल असतात. याला पारंपरिक हात चालवणे असे संबोधले जाते. मिरवणुकीमध्ये सहभागी भक्तांना आनंद मिळेल अशा ठेक्यांना अधिक पसंती मिळत आहे. सध्या गणेशोत्सव, नवरात्रोत्सव सार्वजनिक मिरवणूक, जयंती मिरवणूक, पाडवा अशा विविध सणांना ढोल- ताशा पथकांची मागणी आहे.
नियम पाळणे आवश्यक
प्रत्येक ढोल-ताशा पथकाचे स्वतःचे काही नियम आहेत. ते सदस्यांना तंतोतंत पाळावे लागतात. त्यामध्ये व्यसनाधीनता व गैरवर्तन चालत नाही, सरावात नियमित हजर राहणे, गणवेश परिधान करणे, मुलींनी मुलींचा ढोल स्वतः तानने आणि त्यांनी तो उचलावा यामध्ये पालकांची परवानगी आवश्यक असते. पथकात प्रमुख्याने ढोल, ताशा, टोल, ध्वज, ध्वजावर मानाचा कळस, टोल गाडी व झांजचा समावेश असतो.
कोरोना, महापूर या नैसर्गिक आपत्तींनंतर दोन-चार वर्षे सण-उत्सवांवर बंदी आली होती. त्यामुळे सरावही रखडला होता. मात्र, यंदा गणेशोत्सव निर्बंधमुक्तपणे साजरा होणार असल्यामुळे ढोल-ताशा पथकांना मागणी आहे. शिवाय बुकिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
मयूर वाळके,
रणस्वराज्य ढोल पथक