| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गांवर सावंतवाडीकडे निघालेल्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या खाजगी बसला कर्नाळा पक्षी अभयारण्या जवळ झालेल्या अपघातात एका प्रवशाचा मृत्यू झाला असून, बस मधील 32 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. रविवारी (दि.04) रात्री साडे नऊच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर फरार झालेल्या बस चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
ओमकार ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसमधून जवळपास 49 प्रवासी दहिसर ते सावंतवाडी पर्यंत प्रवास करत होते. प्रवासा दरम्यान बस चालक अतिवेगाने बस चालवत असल्याचे लक्षात आल्याने प्रवाशांनी चालकाला व्यवस्थित बस चालविण्याची सूचना केली होती. तरी ही बसचालक भरधाव वेगाने बस चालवित असल्याचा आरोप बस प्रवाशांनी केला आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री अपघात झाल्याची माहिती समजताच सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्यासह वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघातामधील जखमींना मदतकार्य आणि वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम पहिल्यांदा सुरू झाले. जखमी प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी रस्त्यावरुन इतर वाहनातील प्रवाशांनी संवेदनशील नागरिकांची भूमिका निभावली. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस कर्मचा-यांना इतर प्रवाशांनी मदत करून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना एकामागोमाग एक बसच्या पुढच्या फुटलेल्या काचेतून सुखरुप बाहेर काढले. सहा रुग्णवाहिकांमधून तातडीने प्रवाशांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमी 32 पैकी 28 रुग्ण सोमवारी सकाळी रुग्णालयात उपचार घेत असून, 19 प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. बसचालक नरेंद्र मोहीते उर्फ सूरज याला पोलिसांनी अटक केली आहे.
तरुणाचा मृत्यू
अपघातात 30 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अमोल कृष्णा तळवडेकर असे आहे. अमोल हा राजापूर तालुक्यातील कोंडाये गावचा राहणारा होता. जखमींन मध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. मृत अमोल यांच्यासोबत त्यांची पावणेदोन वर्षांची भाची प्रवास करत होती. ती सुद्धा अपघातामध्ये जखमी झाली आहे.
