पाणी चोरी प्रकरण येणार अंगलट, पाटबंधारे विभागाची माहिती
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील धामोते येथे असलेल्या डिस्कवर रिसॉर्टवर आता संकट घोंगावू लागले आहे. रिसॉर्टसाठी उल्हास नदीवरून पाणी उचलण्यात आले आहे. यासाठी पाटबंधारे विभागाकडून परवानगी घेतलेली आहे. हि परवानगी शेतीसंबंधित पाण्यासाठी वापर करण्यासाठी आहे. मात्र याचा वापर वाणिज्य कारणासाठी करण्यात आला आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने पाहणी केल्यानंतर आता कारवाईचे संकेत दिले आहेत. त्यामुळे रिसॉर्टचे हे पाणी चोरी प्रकरण त्यांच्या चांगल्याच अंगाशी येणार असल्याचे चित्र आहे. कर्जत तालुक्यात छोटी मोठी रिसॉर्ट, फार्महाऊस उभे राहत आहेत. परंतु हे रिसॉर्ट मालक, फार्महाऊसधारक यांना व्यवसाय वाढवण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे क्लुप्त्या लढवत आहेत. असाच प्रकार तालुक्यातील नेरळ कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या नेरळ कळंब या राज्य मार्गावरील डिस्कवर रिसॉर्ट मालकाने केल्याचे चित्र आहे. या रिसॉर्ट मालकाने उल्हासनदीच्या तीरावर चक्क मोटारीची एक केबिन तयार केली असून नदीच्या प्रवाहात एक भलामोठा लोखंडी पाईप पाण्यात सोडून मोटारीच्या सहाय्याने 24 तास पाणी घेतल्याचे समोर दिसत आहे. परंतु येथे कुठल्या आधारावर या रिसॉर्ट मालकाला पाटबंधारे विभागाने 24 तास पाणी घेण्यासाठी परवानगी दिली आहे असा प्रश्न या निमित्त उभा राहिला होता. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यावर पाटबंधारे विभागाने संबंधित तक्रारीची खात्री करण्याकरिता रिसॉर्टवर भेट दिली. तेव्हा त्यांनाही सर्व प्रकार लक्षात आला. त्यानुसार त्यांनी आता या रिसॉर्टवर कारवाईची तयारी सुरु केल्याचे सांगितले आहे.
- पाटबंधारे विभागाकडून रिसॉर्टसाठी पाणी उचलण्याची परवानगी आहे. मात्र 2015 नंतर नियम बदलले तेव्हा त्यात त्यांनी शेती असे म्हंटले आहे. आम्ही रीतसर परवानगी घेऊन जी काही शासनाची फी आहे ती भरून पाणी उचलतोय. – शैलेश महाडिक, डिस्कव्हर रिसॉर्ट
- आम्हाला तक्रार प्राप्त झाल्यावर नेरळ धामोते येथील डिस्कव्हर रिसॉर्ट येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यामुळे त्यांच्यावर आता सर्व कागदपत्र तपासून, कधीपासून हे सर्व सुरु आहे. या सगळ्याचा तपशील मांडत दंड आकारून योग्य ती कारवाई केली जाईल. – भरत गुंटूरकर, उपअभियंता पाटबंधारे उपविभाग, कर्जत