रायगड पोलिसही सतर्क
निर्बंधांमुळे पाटर्यांसाठी मद्यविक्रीच्या परवान्यांना ब्रेक
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तयार असलेल्या नागरिकांच्या उत्साहावर निर्बंधाचे पाणी पडल्यानंतर हे निर्बंध अंमलात आणण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाबरोबरच रायगड पोलिस देखील सर्तक झाले आहेत. उत्पादन शुल्क देखील आपला फौजफाटा घेऊन तयार असणार आहे. रात्री 9 पर्यंतच परवानगी असल्याने मद्यविक्रीच्या परवान्यांना प्रतिसादच नसल्याने विविध पार्ट्यांना ब्रेक लागलाच आहे.
रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये नववर्ष स्वागत 31 डिसेंबर, अनुषंगाने रायगड जिल्ह्यास अलिबाग, मांडवा, रेवदंडा, काशीद, मुरुड, श्रीवर्धन, दिवेआगर या ठिकाणी समुद्र किनारपट्टी असल्याने तसेच माथेरान थंड हवेचे ठिकाणी खोपोली, खालापूर, कर्जत या तालुक्यातील फार्म हाऊसेस व कॉटेज तसेच समुद्र किनारपट्टी वरील गावामधील हॉटेल लॉजेस व कॉटेजेस अशा ठिकाणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे येथील महानगरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर नववर्ष स्वागतासाठी व पर्यटनासाठी येत असतात. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाकडून नागरिकांच्या सुरक्षितेतेच्या व कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. तसेच कोविड-19, तसेच ओमिक्रोन विषाणू महामारीचा प्रतिबंध करणे अत्यंत जरुरी आहे.
जिल्ह्यातील एकूण 28 पोलीस ठाणेकडे प्रत्येकी विशेष पथके तयार करण्यात आली असून हॉटेल, ढाबे, कॉटेज, फार्म हाउस येथे गैरकृत्य होणार नाहीत याची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच सर्व पोलीस ठाण्याचे हद्दीत वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, नागरिकांना प्रवास करताना वाहतूक कोंडीचा कोणताही त्रास होवु नये म्हणून जिल्हा वाहतूक पोलीसांचे मुख्य रस्त्यावर 81 ठिकाणी एकूण 83 वाहतूक पोलीस अंमलदार तैनात करण्यात आलेले आहेत. पोलीस स्टेशन हद्दीतील समुद्र किनारी व पर्यटनाचे ठिकाणी सुरक्षेकरिता फिक्स पॉईंट, पेट्रोलिंग, नाकाबंदी व बंदोबस्तकरिता एकूण 71 पोलीस अधिकारी, 402 पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त नेमण्यात आलेला असून रात्रोच्या वेळी मद्यसेवन करून वाहन चालविणार्या वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.