अलिबाग, रेवदंड्यात अवैध धंद्ये तेजीत; पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे सर्वसामान्य बेजार
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग, रेवदंडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मटका जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरू असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. याबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रारी करुनदेखील कारवाईबाबत दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक भागात तर हिरव्या कापडाच्या झोपड्या तयार करुन त्याच्या आडून अवैध धंदे सुरू असून, पोलिसांच्या दुर्लक्षित कारभारामुळे सामान्य नागरिक बेजार झाले आहेत.
अलिबागमधील घरत आळी परिसरापासून, पोयनाड, हाशिवरे, खंडाळे, रामराज, बोर्ली, रेवदंडा, चौल, वावे या भागात राजरोसपणे मटका जुगार सुरु असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही ठिकाणी सोन्याच्या दुकानाच्या मागील बाजूला, काही ठिकाणी बिअर शॉपीच्या मागील बाजूस, तर काही मोकळ्या जागी हिरव्या कापडाचा आधार घेत मटका जुगार चालवित आहेत. ही बाब अलिबाग, रेवदंडा पोलिसांना माहीत असतानादेखील पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. मटका जुगारामुळे अनेक कुुटुंबं उद्ध्वस्त होण्याची भीती असतानाही याकडे मात्र अलिबाग पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत, त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
रेवदंडा हद्दीत असलेल्या मटका जुगारावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तैनात केली जाणार आहे.
राहुल अतिग्रे, रेवदंडा पोलीस ठाणे