विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील परळी ग्रामपंचायत हद्दीतील परळीपासुन फक्त दोन किमी अंतरावर असलेल्या नानोसे येथील जिल्हा परिषद शाळेची जीर्ण इमारत अतिशय धोकादायक बनली आहे. इमारत दुरुस्तीसाठी, शाळा व्यवस्थापन समितीने प्रस्ताव दिल्यानंतरही शिक्षण विभाग याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून याविषयी माहिती दिली आहे.
इमारत दुरुस्तीसाठी, शाळा व्यवस्थापन समितीने प्रस्ताव दिल्यानंतरही शिक्षण विभाग /आणि गटविकास अधिकारी याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. नानोसे या गावात एक ते चार वर्गापर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत सुमारे 30/35 च्यावर विद्यार्थी शिक्षण घेतात. येथे शिकवणीसाठी दोन शिक्षक आहेत. शाळेसाठी वीस वर्षांपूर्वी 2 वर्ग शाळा बांधण्यात आल्या होत्या. एका खोलीचे नंतर बांधकाम करण्यात आले होते. सुरुवातीला बांधलेल्या शाळेची अवस्था दयनीय आहे. तसेच विद्यार्थी – विद्यार्थिनींसाठी बांधण्यात आलेल्या किचन शेड आणि स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून, शाळेला मुलांना खेळायला प्रांगण नाही, आणि विद्युत मीटरसुद्धा नाही, ही सुद्धा शोकांतिका आहे. तसेच भिंतींनाही मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे शाळेची इमारत कधी कोसळेल, याचा नेम नाही. शाळेची इमारत धोकादायक बनल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे. तसेंच सद्य स्थितीत विध्यार्थी एकाच शाळेत, पहिली तें चौथी चे शिक्षण घेत आहेत.त्यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडू नये याकरिता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेंच शिक्षक यांनी दुरुस्तीसाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला. परंतु याबाबत दखल घेण्यात आली नाही. शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.