पीएनपीतर्फे टीमचा मानपत्र देऊन गौरव
| अलिबाग | प्रतिनिधी |
मराठी रंगभूमीवर गेली तीन दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ‘ऑल द बेस्ट’ हे गाजलेले नाटक आता 5000 व्या प्रयोगाच्या ऐतिहासिक टप्प्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर पीएनपी सहकारी सांस्कृतिक कलाविकास मंडळ अलिबाग यांच्यावतीने नाटकाच्या संपूर्ण टीमचा मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.
सुमारे 32 वर्षांपूर्वी अभिनेते संजय नार्वेकर, अंकुश चौधरी, भरत जाधव आणि संपदा जोगळेकर यांनी या नाटकाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या दमदार अभिनयामुळे ‘ऑल द बेस्ट’ला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि मराठी रंगभूमीवर एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यानंतरही या नाटकाची परंपरा अखंड सुरू राहिली आहे.सध्याच्या घडीला निखिल चव्हाण, मयुरेश पेम आणि मनमित पेम हे कलाकार आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयातून प्रेक्षकांचे तितक्याच ताकदीने मनोरंजन करत आहेत. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन देवेंद्र पेम यांचे असून, त्यांच्या कल्पक मांडणीमुळे आणि अचूक विनोदी टायमिंगमुळे हे नाटक आजही तितक्याच ताजेपणाने रंगमंचावर सादर होत आहे. हजारो प्रयोगांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत ‘ऑल द बेस्ट’ हे नाटक सातत्यपूर्ण यशाचे प्रतीक ठरले आहे. प्रत्येक प्रयोगात कलाकारांची ऊर्जा, संवादफेक आणि रंगमंचावरील जिवंतपणा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो. त्यामुळेच या नाटकाने दीर्घकाळ लोकप्रियता टिकवून ठेवली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल पीएनपी सहकारी सांस्कृतिक कलाविकास मंडळ अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांच्या टीमच्यावतीने अलिबाग नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, मा. नगरसेवक ॲड. गौतम पाटील, अखिल भारतीय नाट्यपरीषदेचे माजी अध्यक्ष तथा आयोजक संदीप गोठिवडेकर, मा. नगरसेविका वृषाली ठोसर तसेच कलाकार देवदत्त नागे, विक्रांत वार्डे, राजन पांचाळ, अमोल नाईक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत नाटकाच्या संपूर्ण टीमचा मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.







