| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या कोकण प्रादेशिक विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा कल्याण येथे श्या.गो.पाटील यांचे अध्यक्षतेखाली व फेस्कॉमचे मुख्य सचिव विवेक देशपांडे यांच्य उपस्थितीत संपन्न झाली. कोकण विभागाचे नूतन उपाध्यक्ष आनंद का.जोशी,प्रादेशिक सचिव विलास काळे,संघटक सचिव विवेक दांडेकर व फेस्कॉमच्या मुख्य सचिव पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल विवेक देशपांडे या सर्वांचा अध्यक्ष पाटील यांचे हस्ते बुके देऊन सत्कार करण्यात आला.सत्कार मूर्तींची आपला परिचय करुन देऊन विचार मांडले.नरेंद्र शहा व यशवंत कोळुसकर यांनी शाली देऊन विवेक देशपांडे व श्या.गो.पाटील यांना सन्मानित केले.
या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे सभेसाठी 94 वर्षे वयाचे आणि दीर्घकाळ ज्येष्ठ नागरिक चळवळीत कार्यरत राहिलेले बाबुराव देशमुख हे महाडहून सभेसाठी एकटे प्रवास करुन आले होते.त्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे 82 वर्षे वयाच्या व अजूनही ज्येष्ठांसाठी डोंबिवली येथे हास्य क्लब चालविणा-या मीनाताई कुलकर्णी यांनी व प्राची करमरकर यांनी हास्य क्लबमधील काही प्रकारांची प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांना खळाळून हसविले.सभेमध्ये माजी अध्यक्ष रमेश पारखे, उस्मान बांगी,आनंद जोशी,डॉ.वृंदा कौजलगीकर ,वनिता केळकर आदिंनी आपली मनोगते व्यक्त केली.पसायदानाने सभेची सांगता झाली.