| अलिबाग | प्रतिनिधी |
अतिरेक्यांची रायगडात रेकी, सायगावमध्ये चेटकीणीचा फेरा, संशयास्पद चरससाठा सापडणे अशा अनेक प्रकारच्या घटना संशयाच्या फेऱ्यात सापडल्या असताना, सोमवारी दुपारी तीन सापडलेले फकीरदेखील संशयाच्या फेऱ्यात सापडले आहेत. अलिबाग पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या तिघांची आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत चौकशी करण्यात येणार असून त्यांना सायंकाळी या कार्यालयात पाठविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून वेगवेगळ्या संशयास्पद घटना घडत आहेत. या घटनांमुळे पोलीसदेखील सर्तक झाले आहे. पुणेमध्ये पकडण्यात आलेल्या तीन अतिरेक्यांनी रायगड जिल्ह्यातील काही भागांत रेकी केल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सायगावमधील फार्महाऊसमध्ये चेटकीनीचा वावर असून एका तरुणाला तिने जखमी केल्याच्या चर्चेला उधाण आले होते. या संशयास्पद चर्चेला पुर्णविराम बसत असताना,गेल्या दोन दिवसांपुर्वी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनारी चरसचा साठा सापडला. हा साठा नक्की कुठून आला. याबाबत वेगवेगळ्या प्रकारची चर्चा जोर धरत असताना, अलिबाग शहराजनजीक खांद्यावर झोळी, डोक्यावर रुमाल बांधलेले तीन अनोळखी इसम संशयास्पदरित्या वावरत असल्याचा मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.
या मेसेजनंतर नागरिकांनी सतर्कता बाळगत माहीती घेण्यास सुरुवात केली. चेंढरे बायपास जवळ काही स्थानिकांना तीन संशयास्पद व्यक्ती दिसून आले. त्यांची स्थानिकांनी विचारणा केल्यावर त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली.
या घटनेची माहिती अलिबाग पोलीसांनी मिळताच अलिबागचे पोलीस उपविभागीय अधिकारी अरुण भोर यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस व अलिबाग पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. ते राशीचक्राच्या अंगठ्या विक्रेते असल्याचे स्पष्ट झाले. ते गुजरात प्रांतात राहिलेले असल्याने त्यांना तेथील भाषा अवगत होती. रायगड जिल्ह्यात दक्षिण रायगडमध्येदेखील त्यांच्या परिचित व्यक्ती असल्याची माहिती उघड झाली आहे. तिघांविरोधात कलम 109 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई अलिबाग पोलीसांमार्फत करण्यात आली असून त्यांची अधिक चौकशी आता स्थानिक गुन्हे शाखेमार्फत केले जाणार आहे. त्यामुळे त्यांना त्याठिकाणी पाठविण्यात आल्याची माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी दिली.