| पनवेल | प्रतिनिधी ।
राज्यात भाजपचीच सत्ता असतानाही पनवेलमध्ये भाजपच्यावतीने नवीन पनवेल येथील उड्डाणपुलावर पडलेले खड्डे बुजवा व या उड्डाण पुलाचे काँक्रीटीकरण करा या मागणीसाठी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ऐन गर्दीच्या वेळी हे आंदोलन करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि त्याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागाला. बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकून पडलेल्या वाहनचालकांनी भाजपच्या या आंदोलनाविरोधात संताप व्यक्त करत राज्यात आणि काही दिवसांपर्यंत पालिकेत सत्ता असतानाही उड्डाणंपूलाची दुरुस्ती करण्यास असमर्थ ठरलेल्या भाजपा आमदारांचे आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी असल्याची टीका करण्यात येत आहे.
नागरिकांची घोर निराशा
पनवेल पालिकेत समावेश करण्यात आल्यानंतर घेण्यात आलेल्या पहिल्याच निवडणुकीत नवीन पनवेलकरांनी भाजपाचे तब्बल 10 नगरसेवक निवडून दिले आहेत. पालिकेत पाच वर्ष महापौरपद भूषवणार्या महापौर डॉ. कविता चौतमोल या देखील नवीन पनवेल मधील प्रभागातूनच निवडून आल्या आहेत. या मुळे निवडून दिलेले प्रतिनिधी आपल्याला जास्तीत सेवा सुविधा उपलब्ध करून देतील हे नवीन पनवेलकरांना अपेक्षित होते. मात्र पाणी आणि चांगले रस्ते या सारख्या मूलभूत सेवा मिळवण्यासाठी देखील झगडावे लागत असलेल्या नवीन पनवेल मधील मतदारांची घोर निराशा झाली आहे.
पनवेल शहरातून नवीन पनवेल वसाहतीत प्रवेश करण्यासाठी बांधण्यात आलेल्या उड्डाणंपूलाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. अनेकदा या खड्ड्यांमुळे अपघात होऊन जखमी होण्याची वेळ वाहनचालकांवर आलेली आहे. सिडकोच्या विभागांंतर्गत येणार्या या उड्डाणंपूलाची पावसाळ्यापूर्वी डागडुजी होणे अपेक्षित होते. मात्र सिडको विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळे दुरावस्था झालेल्या या पुलाची लवकरात लवकर डागडुजी करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आले होते.
सुविधा उपलब्ध करून देण्यास नगरसेवक अपयशी
तब्बल 10 नगरसेवक निवडून देणार्या नवीन पनवेलकरांना खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या उड्डाण पुलावरून प्रवास करावा लागणं हे दुर्दैवी असून, तीन वेळा आमदार आणि सिडकोच्या अध्यक्षपदावर राहिलेले आमदार प्रशांत ठाकूर यांना भर पावसात खड्डे बुजवण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे. आमदार ठाकूर आणि काही दिवसापूर्वी पालिकेवर सत्तेत असलेले भाजपचे नगरसेवक पनवेलकरांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरले असल्याची टीका शेकाप पनवेल जिल्हा चिटणीस गणेश कडू यांनी केली आहे.