कागदी पासवरच विद्यार्थ्यांना करावा लागतोय प्रवास
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
साध्या तिकीटावरून मशीनद्वारे तिकीट देण्याचे काम एसटी महामंडळाने सुरु केले. कामकाज हायटेक करण्याचा प्रयत्न महामंडळाने केला. परंतु नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे सुरु असलेला एसटीचा हायटेक कारभार पुन्हा कागदी पासावरच आला आहे. एसटीच्या स्मार्टकार्ड योजनेला ब्रेक लागला आहे. जिल्ह्यातील लाखो विद्यार्थी, नियमीत प्रवास करणारे प्रवासी कागदी पास घेऊनच प्रवास करीत आहेत. त्यामुळे महामंडळ हा कारभार कधी सुधारणार असा सवाल प्रवासी वर्गाकडून केला जात आहे.
पूर्वी विद्यार्थी कागदी पास घेऊन एसटीतून प्रवास करीत होते. त्यात सात दिवसाचा प्रवास करणारे प्रवासीदेखील कागदी पासच्या अधारे प्रवास करीत होते. कागदी पास गहाळ होण्याबरोबरच खराब होणे, फाटण्याचा प्रकार घडत असल्याने एसटी महामंडळाने हायटेक होत कागदी पासच्या जागी स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेतला.
2016 पासून स्मार्ट कार्ड योजना सुरु केली. एटीएम कार्डसारखे अद्ययावयत असे स्मार्टकार्ड विद्यार्थ्यांसह अन्य पासधारकांसाठी ओळखपत्र बनले. एसटीतून प्रवास करताना ते ओळखपत्र स्कॅन केल्यावर त्याची संपूर्ण माहिती पॉझ मशीनवर येऊ लागली. कागदी पासापेक्षा स्मार्टकार्ड हाताळणे सोपे झाले. त्या स्मार्टकार्डच्या अधारे विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध झाली. त्यामुळे एसटीच्या हायटेक कारभाराबाबत विद्यार्थ्यांसह अन्य पासधारकांनी समाधान व्यक्त केले. कागदी पासच्या जागी स्मार्टकार्ड आल्याने विद्यार्थी व अन्य प्रवासीदेखील आनंदी झाले. मात्र नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे एसटीचा कारभार झाल्याचे दिसून आले. गेल्या दोन वर्षापासून ही योजनाच बारगळली. ज्या कंपनीला स्मार्ट कार्ड तयार करण्याचे काम दिले होते. त्याच कंपनीच्या तांत्रिक कामांमध्ये बिघाड झाला. त्यामुळे नव्याने स्मार्टकार्ड मिळविणे आणि नूतनीकरण करण्याच्या कामेही खोळंबली. त्यामुळे पुन्हा जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांसह अन्य प्रवाशांवर कागदी पासने प्रवास करण्याची वेळ आली आहे.
एसटी महामंडळाने डिझेलच्या जागी सीएनजीवर चालणार्या बसेस सुरु केल्या आहेत. अनेक बसवर जीपीएसची सुविधा उपलब्ध केली आहे. साध्या तिकीटच्या जागी आधुनिक पध्दतीने तिकीट देण्याचे काम सुरू केले आहे. अशा वेगवेगळ्या कामात एसटी हायटेक होण्याचा प्रयत्न करीत असताना प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचा कारभाराला ब्रेक लागतो असा सवाल उपस्थित केला जात आहे. मागील काही वर्षापुर्वी एसटीत वायफायसेवा सुरु केली होती. ही सेवादेखील बंद पडली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या असणार्या एसटीचा कारभार कधी सुधरणार असेही बोलले जात आहे.