| पनवेल | वार्ताहर |
मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे लेनवर कि.मी 5-300 शिवकर गावाजवळ पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत भरधाव कार रेलिंगला धडकल्याने झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत.
टाटा सुमो व्हिस्टा कारवरील चालक पंकज भगरे हे पनवेल ते सांगोला – सोलापूर असे जात होते. पुणे लेन किमी 5-300 जवळ आले असता, त्यांच्या वाहनासमोर अज्ञात कार चालकाने अचानक ब्रेक मारल्याने सुमो कार चालकाचा कारवरील ताबा सुटुन कार पहिल्या लेनवरून अनियंत्रित होऊन डाव्या बाजूच्या लोखंडी रेलींगला जोरात धडकली आणि रेलिंगचे बाहेर जाऊन झाडाला धडकून उजव्या बाजुस पलटी झाली. या अपघातात चालक पंकज भगरे (40) नवीन पनवेल याच्यासह संजय खंडागळे (55), पनवेल या दोघांच्या तोंडाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच, आरती भगरे, प्रवीण भगरे, दोन्ही रा. नवीन पनवेल, सुजित खंडागळे, सरीता खंडागळे, दोन्ही रा. रोहिंजन यांना किरकोळ दुखापती झाल्या असून त्यांना उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे खाजगी वाहन व आयआरबीच्या रुग्णवाहिकेने रवाना केले असून या अपघातात कारचे नुकसान झाले आहे.