। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
क्षात्रैक्य समाज, अलिबागच्या वतीने होतकरु विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट बोर्ड, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड या आणि अशा स्वरुपाच्या स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण वर्ग क्षात्रैक्य समाज हॉल, उंडीचे भाट, कुरुळ येथे सुरु केले आहेत. यावेळी रायगड जिल्ह्याच्या कृषी अधीक्षक उज्ज्वला बानखेळे यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जाऊ इच्छिणार्या महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दर रविवारी सकाळी 8 ते 10 या वेळेतील सदर वर्गात स्थानिक व्याख्यात्यांसह रायगड जिल्ह्यातील विविध खात्यातील या परीक्षांना सामोरे गेलेले अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. सदर प्रशिक्षण वर्ग हे पूर्णपणे मोफत असून, कोणत्याही क्षेत्रात पदवी प्राप्त केलेल्या किंवा करत असलेल्या विद्यार्थ्यांना जात-धर्मविषयक कोणत्याही अटींशिवाय खुले आहे. यात संस्थेचे अध्यक्ष अविनाश राऊळ, सचिव प्रदीप नाईक, संयोजक अॅड.विलास नाईक, सहसचिव महेश कवळे, के. डी. पाटील, श्रीनाथ कवळे, हर्षल घरत आणि इतर सर्व सहकारी यांच्या सहकार्याने प्रशिक्षण वर्ग भरविण्यात आले आहेत.