खोदलेल्या रस्त्यावर आदळून तरुणाचा अपघात; अधिकारी घटनास्थळावरून पळून गेल्याचा आरोप
| अलिबाग | प्रतिनिधी |
एमएसआयडीसीने खोदलेल्या रस्त्यावर वाहनचालकांच्या सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याचे चित्र सध्या चौल, नागाव परिसरात दिसून येत आहे. दरम्यान, सूचना फलक आणि बॅरिकेट्सअभावी नागाव-खारगल्ली येथे सोमवारी (दि.5) रात्री मोटारसायकलस्वाराचा अपघात झाला. सुशांत विश्वनाथ पाटील (43) असे अपघातग्रस्त तरुणाचे नाव आहे. त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून, अलिबाग जिल्हा रुग्णालयातून त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातग्रस्त तरुणाला उपचारासाठी नेण्याऐवजी एमएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरुन काढता पाय घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
अलिबाग-मुरुड रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम एमएसआयडीसीकडून मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे. सोमवारी रात्री नागाव-खारगल्ली येथे रस्ता खोदून ठेवण्यात आला होता. कामाचा कोणताही अंदाज न आल्याने चौल-सागमळा येथील सुशांत पाटील यांची मोटारसायकल खोदलेल्या रस्त्यावर आदळून घसरली. यात त्यांच्या चेहऱ्याला मोठ्या जखमा झाल्या. नागाव आणि चौल परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याचे खोदकाम सुरू असून, बॅरिकेट्स अथवा सूचना फलक नसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. यापूर्वीही या ठिकाणी अपघात झाले आहेत. मात्र, संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित एमएसआयडीसीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जखमी तरुणाला उपचारासाठी नेण्याऐवजी घटनास्थळावरून काढता पाय घेतल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. बेजबाबदारपणाला जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.






