जीवरक्षकांकडेही सुरक्षा साधनांचा अभाव
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील नागाव समुद्रकिनारा हा पर्यटनासाठी प्रसिद्ध होत असला तरी पिरवाडी परिसरातील धोकादायक टापूमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. भरती-ओहोटीचा अंदाज न आल्याने वारंवार पर्यटक टापूवर अडकत असून, त्यांना वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि जीवरक्षकांना स्वतःचा जीव धोक्यात घालून समुद्रात उतरावे लागत आहे.
शनिवारी मुंबईहून फिरण्यासाठी आलेले एक जोडपे भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पिरवाडी दर्ग्यालगतच्या टापूवर अडकले होते. परिस्थिती गंभीर होताच सागरी सुरक्षा रक्षक आणि स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत बचावकार्य राबवून त्या दोघांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अशा प्रकारच्या घटना या परिसरात सातत्याने घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
बाजारपूर ते पिरवाडी दरम्यान सुमारे सात ते आठ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा असून, पिरवाडीसमोरील टापू पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. ओहोटीच्या वेळी सहज जाता येणारा हा टापू भरती सुरू होताच काही मिनिटांत समुद्राच्या पाण्याने वेढला जातो. परिणामी अनेक पर्यटक अडकून पडतात आणि मदतीसाठी आर्त हाका मारतात.
धक्कादायक बाब म्हणजे, या ठिकाणी बचावकार्य करणाऱ्या जीवरक्षकांकडे आवश्यक सुरक्षा साधनसामग्रीच उपलब्ध नाही. लाइफ जॅकेट, लाइफ बॉय, दोरखंड, बचाव नौका यांसारखी मूलभूत साधने नसतानाही जीवरक्षक आणि स्थानिक युवक समुद्रात उतरून पर्यटकांचे प्राण वाचवत आहेत. त्यामुळे पर्यटकांसोबतच बचावकार्य करणाऱ्यांचाही जीव धोक्यात येत आहे.
विशेष म्हणजे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत नागाव, काशीद आणि हरिहरेश्वर या समुद्रकिनाऱ्यांवर अत्याधुनिक रोबोटिक वॉटर क्राफ्ट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, वारंवार बचावकार्याची गरज भासणाऱ्या पिरवाडी किनाऱ्यावर अशी कोणतीही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. याबाबत उरण तालुका मराठी पत्रकार संघाने जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे पिरवाडी किनाऱ्यासाठी रोबोटिक वॉटर क्राफ्ट, अत्याधुनिक बचाव साहित्य आणि आवश्यक सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच धोकादायक क्षेत्र असल्याचे इशारा फलक, भरती-ओहोटीची माहिती देणारी यंत्रणा आणि प्रशिक्षित बचाव पथक तैनात करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत असलेल्या या परिसरात सुरक्षेच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करीत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
'पिरवाडी किनाऱ्यावर स्थानिक नागरिक आणि जीवरक्षक स्वतःचा जीव धोक्यात घालून पर्यटकांचे प्राण वाचवत आहेत. मात्र, प्रशासनाकडून आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून दिली जात नाही. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?' असा सवाल उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम दामोदर कडू यांनी उपस्थित केला आहे.






