मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
करंजाडे तलावालगत असलेल्या स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांचा अभाव पुन्हा एकदा उघड झाला आहे. करंजाडे येथील रहिवासी जैस्वाल यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी संपूर्ण स्मशानभूमी अंधारात असल्याने नातेवाईक आणि उपस्थित नागरिकांना मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात अंत्यविधी पार पाडावे लागले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येने नातेवाईक आणि नागरिक स्मशानभूमीत दाखल झाले होते. मात्र, तेथे वीजपुरवठा आणि प्रकाशव्यवस्थेचा पूर्णपणे अभाव असल्याने धार्मिक विधी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बाहेरगावाहून आलेल्या नातेवाईकांना अंधारामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
सीआयडीसीओच्या वेगाने विकसित होत असलेल्या करंजाडे परिसरात स्मशानभूमीसारख्या अत्यावश्यक ठिकाणीही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याबद्दल नागरिकांनी तीव्र खंत व्यक्त केली. कायमस्वरूपी वीज जोडणी, उच्च क्षमतेचे दिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे करंजाडे शाखाप्रमुख गणेश उत्तेकर म्हणाले, स्मशानभूमी हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अपरिहार्य वास्तव आहे. अशा ठिकाणी अंधारात अंत्यसंस्कार करण्याची वेळ येणे अत्यंत दुर्दैवी आहे. ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाने तातडीने वीज जोडणी, उच्च क्षमतेचे दिवे व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. भविष्यात कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये, यासाठी त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी प्रकाशयोजना व आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.







