स्व. प्रभाकर पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम
। अलिबाग । प्रतिनिधी ।
ग्रामीण भागातील गरीब, गरजू मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी, म्हणून शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात आतापर्यंत 25 हजारहून अधिक सायकल वाटप करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील शाळकरी मुलींना शुक्रवारी (दि.21) सायंकाळी सायकल भेट देण्यात आली. स्व. प्रभाकर पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. सायकली मिळाल्याने मुलींच्या चेहर्यावर एक वेगळा आनंद दिसून आला.

यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, पीएनपीचे सर्वेसर्वा नृपाल पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, शेकाप राज्य कामगार आघाडी प्रमुख प्रदिप नाईक, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शैला पाटील, अॅड. निता पाटील, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील, गजानन पाटील, काका ठाकूर, युवराज पाटील आदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.
स्व. नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील व अॅड. दत्ता पाटील यांनी त्याकाळी ग्रामीण भागात शिक्षणाची दारे खुली केली. त्यांचा हा वारसा जपण्याचे काम शेकाप सरचिटणीस जयंत पाटील करीत आहेत. शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख यांनीदेखील शिक्षणाला महत्व देत मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला आहे. गावे, वाड्यांमधील मुलींना शाळेत जाण्यासाठी साधने नसल्याने त्यांना अर्धवट शिक्षण सोडावे लागते. हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी चित्रलेखा पाटील यांनी पुढाकार घेतला. गावे, वाड्यांमधील शाळकरी मुलींसाठी सायकली देण्याचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमातून मुलींच्या चेहर्यावर हसू आणण्याचे काम त्यांनी केले आहे. सायकलीतून मुलींच्या शिक्षणाला गती देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करण्यात आला.
शिक्षण हाच विकासाचा खरा पाया आहे. मुली शिकल्या पाहिजे, मुलींची शैक्षणिक प्रगती झाली पाहीजे ही भूमिका घेऊन मुलींच्या शिक्षणाला गती देण्यासाठी रायगडसह उस्मानाबाद, धुळे अशा अनेक ठिकाणी हजारो मुलींना सायकली वाटप केल्या आहेत. स्व. प्रभाकर पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आझाद मैदानात कुरुळमधील शाळकरी मुलींना सायकल वाटपाचा सोहळा पार पडला. सायकली मिळाल्यावर मुलींनी मैदानात सायकल चालविण्याचा आनंद लुटला.