सुधागडातील रेशन दुकानदार संतापले
| पाली | वार्ताहर |
स्वस्त धान्य दुकानामार्फत होणार्या रेशन धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी या हेतूने राज्यभरात ई-पॉस या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. परंतु, ई-पॉस मशीनचे सर्व्हर वारंवार डाऊन होत आहे. तसेच, स्लो नेटवर्कमुळे लिंक फेल होऊन रेशन वितरणात अडचणी येत आहेत. परिणामी, लाभार्थ्यांसह स्वस्त धान्य दुकानदारही त्रस्त झाले असून, संतापलेल्या सुधागड तालुक्यातील सर्वच रेशन दुकानदाराने अखेर सुधागड तालुका स्वस्त भाव धान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार (दि.27) रोजी दुपारी पाली तहसील कार्यालयावर धडक देत संताप व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, तहसीलदार उत्तम कुंभार यांची भेट घेऊन झाल्यानंतर दुकानदारांनी आपला मोर्चा पुरवठा शाखेकडे वळवीत, येथील पुरवठा निरीक्षक, पुरवठा निरीक्षण अधिकारी यांना घेराव घालीत त्यांच्याकडे ई-पॉस मशीन जमा केल्या असून, ज्यावेळेस सर्व्हरची अडचण दूर होईल, त्यावेळेस आम्ही मशीन घेऊन जाणार, असे दुकानदारांनी सांगितले.
यावेळी अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांनी सांगितले की, ई-पॉस मशीनमध्ये धान्य घेण्यासाठी ग्राहक अंगठा लावत असताना सर्व्हर प्रॉब्लेममुळे प्रत्येकाला 15 ते 20 मिनिटं, तर कधी अर्धा तासदेखील लागत आहे. त्यामुळे दिवसभरात 20 ते 30 लोकांना धान्य दिले जात आहे. त्याचा परिणाम रेशन दुकानावर रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आणि नागरिकांना वेळ लागत असल्यामुळे नागरिकदेखील रेशन दुकानदारावर चिडचिड करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा अन्यथा तालुक्यातील कार्डधारकांचा पाली तहसील कार्यालयावर लवकरात मोर्चा काढण्याचा इशारा कुलकर्णी यांनी दिला. याप्रसंगी तालुक्यातील दुकानदार उपस्थित होते.
प्रशासनाविरोधात संताप
ई-पॉस मशीन जमा केल्यामुळे जे सर्वसामान्य कार्डधारक अन्नधान्यापासून वंचित राहतील, याला प्रशासन जबाबदार असेल. ई-केवायसी करण्याची जबाबदारी रेशन दुकानदारांची नसतानाही प्रशासन दुकानदारांवर दबाव टाकत असून, प्रशासनाने त्यांना नोटिसा काढल्याने यावेळी दुकानदाराने प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला.
ई-केवायसी न केलेले तालुक्यातील 1437 कार्डधारक रद्द करण्यात असून, जसजशी त्यांची ई-केवायसी होईल तसं त्यांचे धान्य पूर्ववत करण्यात येईल.
– सुखदेव वाढणकर, तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी