कंपनीतील कामगार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल कंपनीतील कामगाराचा गुरुवारी (दि. 27) दुपारी अपघाती मृत्यू झाला. लोखंडी शिगा लोडींगचे काम करीत असताना माल अंगावर पडून तो मृत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेने कामगार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बपनकुमार दास (27) असे या कामगाराचे नाव आहे. हा कामगार मुळचा बिहार राज्यातील आहे. गेल कंपनीमध्ये नव्याने उभारण्यात येणार्या प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कामगार गेल कंपनीत काम करीत होता. गुरुवारी दुपारी लोखंडी स्टील लोडींगचे काम सुरु होते. मात्र, अचानक बपनकुमार या कामगाराच्या अंगावर लोखंडी स्टीलचा माल पडला. त्यामुळे कामगाराला गंभीर दुखापत झाली. त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, अगोदरच मृत झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कंपनीतील घटनेनंतर कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही कामगारांची अवजड वाहनामधून बेकायदेशीररित्या वाहतूक केली जात असल्याचे चित्र आहे. टेम्पोमध्ये कोंबून कामगारांची ने-आण होत असल्याचे प्रकार घडत असल्याची चर्चा जोरात आहे. त्यामुळे रेवदंडा पोलीस याकडे गांभीर्याने लक्ष देतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेबाबत रेवदंड्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.