। खरोशी । वार्ताहर ।
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पेण तालुकास्तरीय उत्कृष्ट पाककृती स्पर्धा संपन्न झाली. ही स्पर्धा पेण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अरुणादेवी मोरे व नगरपालिका प्रशासनाधिकारी संगीता माने यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.28) नगरपालिका उर्दू शाळा क्र.5 येथे पार पडली. या स्पर्धेते 22 पाककलांचे सादरीकरण करण्यात आले होते.
राज्यामध्ये आंतराराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी शासनाने उत्कृष्ट पाककृती केंद्रनिहाय तालूकास्तरीय स्पर्धा घेऊन प्रथम तीन क्रमांक जिल्हा स्तरावर कळविण्याचे निर्देश दिले होते. त्या अंतर्गत पेण गटातील तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या स्पर्धेते 22 पाककलांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये राजिप शाळा धोंडपाडा येथील पालक आरती भोईर या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांनी तृणधान्यापासून सुकडीचे पौष्टिक लाडू, मिश्र तृणधान्य थालीपीठ व खोबर्याची चटणी असे पदार्थ बनवेल होते. राजिप शाळा गोविर्ले येथील पालक सुषमा पाटील या द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांनी कडधान्यांची पेज, बिटाच्या वड्या-लाडू, मुग-मटकीचे मोदक, नऊ प्रकारच्या पिठाचे घावण व गाजर, बीट, नाचणी व गहूपासून लाडू यांची उत्कृष्ट मांडणी केली होती. तर, राजिप शाळा तरणखोप येथील कलावती पाटील या तृतीय क्रमांकांच्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांनी बाजरीची भाकरी व ठेचा, नाचणीची इडली, सूप, कन्या, डोसा, उत्तप्पा मोमोज, चकलीसह बिस्किट, करी-तांदूळभात बनवले होते.
यावेळी तालुका स्तरावरील सर्वोत्कृष्ट पाककृतीसाठी अनुक्रमे 5 हजार, 3 हजार 500 व 2 हजार 500 अशा स्वरूपाचे बक्षिस देण्यात आले. यावेळी केंद्र प्रमुख प्रमोद पाटील, दत्तात्रेय कोठेक, विजय पाटील, दिलीप पाटील, मुकुंद पाटील, राजाराम म्हात्रे, प्रिती पाटील, लोहारे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.