कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना बियाणे मोफत वाटप
| अलिबाग | प्रतिनिधी |
फळपिकाबरोबरच आता कडधान्य पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभाग कामाला लागले आहे. जिल्ह्यातील हरभरा, मूग पिकाचे क्षेत्र वाढविण्यावर या विभागाने भर दिला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. या पीक लागवडीतून शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 19 हजार 15 क्विंटल बियाणे उपलब्ध असून तालुका स्तरावर वितरण सुरु केले आहे. जिल्ह्यात 680 हेक्टर क्षेत्रामध्ये बियाणांची लागवड केली जाणार आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये भात पिकानंतर वाल, हरभरा, मूग, चवळी अशा अनेक कडधान्यांची लागवड केली जाते. या पिकांतून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन खुले होते. पावसाळ संपल्यावर कडधान्य लागवड केली जाते. याला रब्बीचा हंगाम बोलले जाते. या या रब्बीच्या हंगामात कडधान्य पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. त्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचे कामही कृषी विभागामार्फत केला जात आहे.
राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हरभरा, मूग कडधान्य वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याला हरभरा आणि मुगाची 19 हजार 015 क्विंटल बियाणे प्राप्त झाले असून, तालुकास्तरावर त्याचे वितरण झाले आहे. तालुकास्तरातूनही शेतकऱ्यांना ही बियाणे देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याला हरभरा व मूग लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये उरण, म्हसळा व श्रीवर्धन मध्ये प्रत्येकी 20 हेक्टर, पनवेलमध्ये 35 हेक्टर, मूरूडमध्ये 44 तसेच खालापूर, सुधागडमध्ये प्रत्येकी 45 हेक्टर, पोलादपूरमध्ये 40 हेक्टर, तळामध्ये 46 हेक्टर, अलिबागमध्ये 55 हेक्टर, पेणमध्ये 60 हेक्टर, कर्जतमध्ये 70 हेक्टर, माणगाव, रोहा व महाडमध्ये 60 हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड केली जाणार आहे. या तालुक्यात 50 ते 80 हेक्टर, तसेच मुरूड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, उरण या तालुक्यात 20 ते 40 हेक्टर क्षेत्रामध्ये हरभऱ्याची लागवड केली जाणार आहे. हेक्टरी 75 किलो प्रमाणे प्रत्येक तालुक्यात एक हजार 500 किलो पासून सात हजार 500 किलो बियाणे देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
पडक्षेत्रामध्येही केली जाणार लागवड
रायगड जिल्ह्यात शेतांसह पड क्षेत्रामध्येही कडधान्य लागवड केली जाणार आहे. 232 हेक्टर क्षेत्रामध्ये ही लागवड केली जाणार आहे. चार हजार 640 क्वींटल बियाणे त्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये दहा ते 30 हेक्टर क्षेत्रामध्ये मूग बियाणांची लागवड केली जाणार आहे. उत्पादन वाढीसाठी हा प्रयत्न केला जाणार आहे. नऊ तालुक्यांमध्ये प्रत्येकी 20 हेक्टर तर पोलादपूरमध्ये दहा व तळामध्ये 12 हेक्टर तसेच खालापूरमध्ये 30 हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
