| अलिबाग | प्रतिनिधी |
शासन आणि शासकीय कर्मचारी जनतेच्या हितासाठीच आहे. सर्व कर्मचारी संघटनांनी जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांना येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकर्यांनी विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, तहसिलदार सचिन शेजाळ तसेच विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांनी संघटनांच्या पदाधिकार्यांना आश्वासित केले की, त्यांच्या मागण्या शासनाकडे सकारात्मकतेने निश्चित कळविल्या जातील. मात्र शासकीय कर्मचारी म्हणून आपली जबाबदारी ओळखून आपण जनतेच्या हितासाठी, जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. चर्चेतून मार्ग निश्चित निघेल. जनभावना अत्यंत महत्त्वाची बाब आहे. लोक संपकर्यांच्या बाजूने असणे गरजेचे आहे. पाणी, आरोग्य यासारख्या अत्यावश्यक सुविधा बाधित होणार नाहीत, याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. रायगड मधील जनता सहनशील आहे. त्यांच्या भावनांचा आदर राखून सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या मान्य करून घेता येणे शक्य आहे. प्रशासनाचा प्रमुख म्हणून मी करीत असलेल्या आवाहनास सर्व कर्मचारी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा.
यावेळी उपस्थित कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनीही प्रशासनास आश्वासित केले की, अत्यावश्यक सुविधा निश्चितच बाधित होणार नाहीत. जनतेला कोणत्याही प्रकारची सुविधा होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेवू. संपकाळात कोणतेही गैरकृत्य घडणार नाही याची खबरदारी घेऊन कर्मचार्यांच्या मागण्या सनदशीर मार्गाने पूर्ण होण्यासाठी नेटाने एकजुटीने प्रयत्न केले जातील. शेवटी तहसिलदार सचिन शेजाळ यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.