। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव येथील जे.बी.सावंत एज्युकेशन सोसायटीच्या टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना गुरुवारी (दि.25) करण्यात आली. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्राचे सल्लागार भाऊसाहेब सावंत उपस्थित होते. सावंत यांनी श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक विद्यार्थ्यांना सांगितला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा श्रद्धेला विरोध नाही. प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेप्रमाणे उत्सव,साजरे करतात. त्यांनी ते करावेत, परंतु देवाच्या नावावर बुवाबाजी करून अंधश्रद्धा पसरवू नये, असे आवाहन करून अनेक बुवा व बाबांचे उदाहरण त्यांनी दिले.
यासाठी टिएमसी कॉलेजमध्ये एक समिती स्थापन करण्यात आली. समितीचे अध्यक्ष म्हणून कांचन यादव, बादल पवार यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला अमित बाकाडे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद,विद्यार्थी आदी उपस्थित होते.