योग्य समुपदेशाने सासू-सुनेच्या वादावर पडदा
| राकेश लोहार | चौल |
आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाची असते. आपल्यात असलेले वाद सामंजस्याने मिटवले, तर आपले कुटुंब भक्कम राहू शकते. यासाठी योग्य समुपदेशन झाले तर वादावर पडदा पडू शकतो, हे रेवदंडा पोलिसांनी कृतीतून दाखवून दिले आहे.
पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांच्या नेतृत्वाखाली कोरोना काळात कौतुकास्पद आणि विधायक काम करणार्या रेवदंडा पोलिसांनी मागील पाच वर्षांपासून सुरु असलेले सासू-सून, नवरा-बायको यांच्यातील भांडण मिटावे यासाठी दोन्ही बाजूंचे योग्य समुपदेशन केले. यासाठी पोलीस नाईक शंकर काशिनाथ वारगुडे आणि पोलीस नाईक केदारनाथ साखरकर यांनी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. “जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा”, असे जद्गुरु संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. त्याच उक्तीचा तंतोतंत प्रत्यय पो.ना. वारगुडे आणि पो.ना. साखरकर यांनी दाखवून दिला.
सासू-सुनेचे वाद हे काही नवीन नाहीत. प्रत्येक घरामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात. आजकालच नव्हे, तर पार पूर्वीपासून घराघरात सासू-सुनेचा संघर्ष पहावयास मिळतो. असाच प्रकार चौलमळा येथील कुटुंबामध्ये मागील चार-पाच वर्षांपासून सुरु होता. सासू-सासरे आणि नवरा-बायको असे एकत्र कुटुंब आहे. परंतु, क्षुल्लक कारणांवरुन यांच्यात कायमच वादाची ठिणगी पडत असे. आणि मग भांडण झाले की, पोलीस ठाण्याचे दार ठोठावले जायचे. आजतागायत हे असेच सुरू होते. घरच्या चार भिंतीतील भांडण खरे तर सामोपचाराने सोडविणे गरजेचे असताना पोलीस ठाण्यात जाऊन, तक्रार देऊन समोरच्याला शिक्षा होईपर्यंत प्रकरण लावून धरायचे, यामुळे वाद कायमच वाढत होते. हे कुठेतरी, केव्हातरी थांबणे गरजेचे होते. रक्ताची माणसे एकमेकांसमोर भांडायला उभी ठाकणे, ही गौरवाची बाब मुळीच नाही. संसार टिकावा, कुटुंबही एकत्र राहावे, नाती जपावी, याची योग्य समज यावेळी पोलीस नाईक वारगुडे आणि साखरकर यांनी दिली.
एकाच कुटुंबात पडलेली दरी बुजविण्यात या पोलिसांना अखेर यश आले आहे. कुटुंबात सलोखा-एकोपा नांदावा यासाठी पोलिसांनी घेतलेली मेहनत, आणि केलेले योग्य समुपदेशन कौतुकास्पद आहे. समाजाला आज अशा पोलिसांची गरज आहे. खार्दी वर्दीतील माणूस जेव्हा जागा होतो, तेव्हा अशा घटना आपसूकच होत असतात. रायगडच्या पोलीस दलात खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन दाखविणारे पोलीसही आहेत, हेच यावरुन दिसून येते. वाद वाढविण्यापेक्षा वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेणार्या श्री. वारगुडे आणि श्री. साखरकर यांच्यासारख्या पोलिसांची समाजाला गरज आहे. रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे आणि रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांनी पोलिसांच्या कामाची दखल घ्यावी, असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
कुटुंबात कलह झाल्यावर अनेकजण थेट पोलिसात जाऊन तक्रार दाखल करतात. यामुळं नात्यात आलेला कलह सुटण्याऐवजी त्यातील तिढा आणखी वाढतो. परिणामी, एकमेकांशी असलेले प्रेमाचे नाते कायमचे तुटते. आपसातील भांडण-तंटे सामोपचाराने घरातच मिटवा, जेणकरुन पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची कोणावरही वेळ येणार नाही.
शंकर वारगुडे, पोलीस नाईक
वाद प्रत्येकाच्या घरात होतात. मात्र, त्याचे मूळ शोधून त्याचे निराकरण करणे आपल्या हातात आहे. आपल्यात असलेले वाद सामंजस्याने मिटवले, तर आपले कुटुंब भक्कम राहू शकते. एकमेकांनी समजून घेतले तर घरातले वाद घरातच मिटतील. कधीच पोलीस ठाण्यात येण्याची गरज भासणार नाही. फक्त समजून घेणे महत्त्वाचे आहे.
केदारनाथ साखरकर, पोलीस नाईक