तटकरेंना मुस्लिम मते मिळणार नसल्याचा दावा
। रायगड । खास प्रतिनिधी ।
लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. इंडिया आघाडीने आधीच शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे या दोघांमध्येच खरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गीते निवडून येणार असा दावा करणारे संदेश आता समाजमाध्यमांवर झळकू लागले आहेत. त्यामुळे निवडणूक (दि.7) मे रोजी आणि निकाल मात्र समाजमाध्यमांवर आजच लागल्याचे चित्र त्या निमित्ताने दिसून येत आहे.
सध्या कमी कालावधीत नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे माध्यम म्हणजे समाजमाध्यम होय. आपापल्या भावना, विचार थेटपणे मांडण्याचे एक उत्तम आणि प्रभावी व्यासपीठ आहे. प्रामुख्याने व्हॉटस् अॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यासह अन्य माध्यमांचा त्यामध्ये समावेश होता.
रायगड लोसकसभा मतदार संघामध्ये शिवसेनेचे अनंत गीते विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यामध्ये सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. समाजमाध्यमांवर या दोन्ही नेत्यांचे फोटो झळकत असून यांच्यामध्ये काटे की टक्कर होणार असे मेसेज व्हायरल होत आहेत. इंडिया आघाडीचे अनंत गीते हे तटकरेंचा पराभव करतील आणि निवडून येतील, असा संदेश समाजवादी पक्षाचे अलिबाग तालुकाध्यक्ष अशरफ घट्टे यांनी टाकला आहे. मात्र, मुस्लिम समाजाची मते त्यांना मिळतील असे शिवराज्य ब्रिगेड महाराष्ट्राचे अध्यक्ष शैलेश चव्हाण यांनी म्हटले आहे. परंतु हा मुद्दा खोडून काढत, मुस्लिम समाजाची मते तटकरे यांना मिळणार नाहीत, असे घट्टे यांनी स्पष्ट केले आहे.
चव्हाण आणि घट्टे यांची तटकरे यांनी फसवणूक केली असल्याचे संदेशही त्यामध्ये दिसून येतात. आता खरी वेळ आली आहे, आपली ताकद दाखवण्याची असे घट्टे यांनी पुढे म्हटले आहे. काळ काय ठरवेल माहीत नाही.. पण वेळ मात्र नक्की आली आहे ठरवायची…….मतदार म्हणतात राजकारणात सगळच बदललय तर आता…..बदला, असे आवाहन शेकापच्या माजी नगरसेविका मानसी म्हात्रे यांनी यामध्ये केले आहे.
राजकीय रणांगण तापायला आता कोठे सुरुवात झाली आहे. अद्याप बर्याच सभा, बैठका होणार आहेत. दोन्ही बाजूने प्रचारांच्या तोफा धडाडणार आहेत. त्याचप्रमाणे समाज माध्यमांवर देखील विविध कमेंटस्, मिम्स, विविध पोस्ट झळकणार आहेत. त्यामुळे भविष्यात समाजमाध्यमांवरील युध्द चांगलेच भडकणार असल्याचे दिसून येते.