सांडपाणी प्रकल्पासाठी पेव्हर ब्लॉकचे रस्ते उखडले
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरातील सांडपाणी दरीमध्ये सोडण्यात येत असल्याने प्रदूषण होत होते. त्यामुळे माथेरान शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प शासनाने मंजूर केला आहे. या प्रकल्पाचे कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने तीन वर्षांची मुदत दिली आहे. माथेरान शहरातील रस्त्यांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. न्यायालयाने येथील क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांबाबत स्थगिती आदेश दिले आहेत. मात्र, तरीदेखील माथेरान शहरात सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम करण्यासाठी न्यायालयाचे आदेश असलेले क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते खोदले जात आहेत.
डोंगरावर वसलेल्या माथेरान गिरिस्थानवरील हॉटेल, स्थानिक रहिवाशी यांच्या घरातून बाहेर पडणारे सांडपाणी बहुतांशी दरीमध्ये सोडण्यात आले आहे. त्याबद्दल राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्यानंतर मानवी हक्क आयोगाने राज्य शासनाला माथेरान शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून या प्रकल्पासाठी 47 कोटींचा निधी मंजूर आहे.त्यानंतर माथेरान शहरात सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, माथेरानमध्ये या प्रकल्पाच्या कामासाठी रस्ते खोदण्यास सुरुवात झाल्याने अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. शहरातील रस्त्यांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यात क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्ते दुरुस्त करू नयेत, नव्याने बनवू नयेत तसेच पेव्हर ब्लॉक खराब झाले आहेत त्यांचीदेखील दुरुस्ती करण्यास परवानगी नाही. त्याबाबतचा स्थगिती आदेश फेब्रुवारी 2023 पासून कायम आहे. शहरातील अनेक नागरिकांनी क्ले पेव्हर ब्लॉक चे रस्ते व्हावेत यासाठी आंदोलने झाली असूनउपोषण देखील केले गेले आहेत.
क्ले पेव्हर ब्लॉकचे रस्त्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे स्थगिती आदेश असतानादेखील माथेरानमध्ये पेव्हर ब्लॉक लावलेले रस्ते खोदले जात आहेत. माथेरानमध्ये कोणत्याही प्रकारचे खोदकाम करण्यास बंदी असून, माथेरानमध्ये सनियंत्रण समितीच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची कामे होत नाहीत. मात्र, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामासाठी पेव्हर ब्लॉकचे रस्ते खोदणे, रस्त्यात खोदकाम करणे आदी कामे केली जात आहेत. स्थानिकांनी मागणी असलेले रस्त्यांवर पेव्हर ब्लॉक लावले जात नाहीत, मात्र रस्ते दिवसाढवळ्या खोदले जात असताना सनियंत्रण समितीला खोदकामाची माहिती माथेरान नगरपरिषद प्रशासन देणार आहे की नाही, असा सवाल माथेरान अश्वपाल संघटना यांनी केला आहे. त्यांनी आपल्या तक्रारी लवादाकडे केल्या आहेत.