| इगतपुरी | प्रतिनिधी |
घोटी सिन्नर महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटलजवळ ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाला समोरून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघे जण ठार झाले. तर दोघे जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, घोटी सिन्नर महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटलजवळ ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाला समोरून येणारा कंटेनर दिसला नाही आणि ती रिक्षा कंटेनरला धडकली. यामुळे रिक्षा आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. ह्या अपघातात एका बालिकेसह 3 जण ठार झाले आहेत. रिक्षाचालक अमोल विनायक घुगे (25) कल्याण हा जागीच ठार तर स्वरा अमोल घुगे (4), मार्तंड आव्हाड (60) यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. प्रतीक्षा घुगे (22), कलावती मार्तंड आव्हाड (58), रा. कल्याण हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ट्रकचालक राहुल कुमार प्रजापती (28) रा. झारखंड याला तपासासाठी वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनच्या ताब्यात घेण्यात आले आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.