| पाली /बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील कौलोशी आदिवासी वाडीवरील चिमुरड्यांची शाळेत जाण्याची वाट मोकळी झाली आहे. मनसेच्या पाठपुराव्यानंतर महसूल प्रशासनाने तात्काळ दखल घेत प्रत्यक्ष जागेवर जाऊन विकासकाला सांगून विद्यार्थ्यांसाठी पायवाट करून देण्यात आली. यामुळे चिमुरड्या विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून, पालकांनी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. ग्रामीण भागातील मुले व पालक शिक्षणाकडे सकारात्मक पाहत आहेत, मात्र अशा अडचणीमुळे त्यांच्या शैक्षणिक प्रवासात अडसर येत होता.
या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, कौलोशी कातकरवाडी येथील लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी हक्काचा रस्ता उपलब्ध नव्हता. त्यातच एका विकासकाने आपल्या जागेभोवती मोठे सिमेंटचे कंपाऊंड घातल्यामुळे विद्यार्थ्यांची एकमेव पाऊलवाटही बंद झाली होती. पावसाळ्यात या चिमुरड्यांनी शाळेत जायचे कसे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या दुर्दैवी परिस्थितीबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार यांनी तात्काळ आदेश जारी केले. या आदेशानुसार, मंगळवारी 23 जून रोजी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. यावेळी विकासकाने त्यांच्या जागेतून विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्यासाठी बाजूने पायवाट मोकळी करून दिली. आता या पायवाटेवरून आदिवासीवाडीतील विद्यार्थी आणि शिक्षक कोणतीही अडचण नसताना सुरक्षितपणे शाळेत ये-जा करू शकणार आहेत. या यशस्वी कामगिरीबद्दल आणि रस्ता मोकळा करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे व पदाधिकारी तसेच तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचे विशेष आभार मानले आहेत.







