रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
। अलिबाग । प्रतिनिधी ।
आमिष दाखवून पावणे दोन कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करणारा आरोपी फरार झाला होता. फसवणूक करून दुबईला पसार झालेल्या या आरोपीला रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कोची विमानतळावरून गजाआड केले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रियाज अहमद कासिम बंदरकर (47) असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी मुरूड तालुक्यातील खारीकपाडा येथील रहिवासी आहे. या आरोपीने सहा वर्षापुर्वी तिजाराहा इंटरप्रायझेस नावाची कंपनी सुरु केली होती. मुरूड तालुक्यातील काही नागरिकांचा विश्वास संपाद करून कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास त्याने भाग पाडले. त्या बदल्यात चांगला नफा देण्याचे आमिष दाखविले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी पैशाची गुंतवणूक केली. सुरुवातीला काही दिवस गुंतवणूक केलेल्या रकमेवर नफा दिला. त्यानंतर त्याने नफा देण्यास टाळाटाळ केली. आणि बंदरकर 1 कोटी 78 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करून दुबईला पळून गेला. याप्रकरणी मुरूड पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात 2024 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविला होता. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. दरम्यान, दुबईला पळून गेलेल्या बंदरकर याच्या पासपोर्टची माहिती घेण्यात आली. दिल्ली येथील इमीग्रेशन विभागाला याबाबत माहिती दिली होती. 24 मार्च रोजी तो दुबईतून भारतात केरळ राज्यात आल्याची माहिती मिळाली. त्याला कोची येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे इमीग्रेशन अधिकार्यांनी ताब्यात घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना मेलद्वारे कळविले. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक रुपेश नरे व पोलीस कर्मचारी यांना कोची येथे तात्काळ पाठवून फरार आरोपीला ताब्यात घेतले. त्याला अलिबागमध्ये आणून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.