मुलूखमैदानी तोफ थंडावली…

माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधन; शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

| अलिबाग | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्या झुंजार, लढवय्या नेत्या, अभ्यासू व्यक्तिमत्त्व, भाषा प्रभुत्व, रायगडची मुलुखमैदानी तोफ म्हणून ज्यांचा गौरव व्हायचा. अशा माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी (दि. 29) देहावसान झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास पेझारी-आंबेपूर येथील निवासस्थानी वयाच्या 76 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळतास रायगड जिल्ह्यावर शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर आंबेपूर येथे शासकीय इतमामात हजारोंच्या संख्येने शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील दिग्गज, विविध पक्षांचे नेतेमंडळी, शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, हजारोंचा समुदाय आंबेपूर येथील स्मशानभूमीत त्यांना निरोप देण्यासाठी जमला होता. यावेळी ‌‘मीनाक्षीताई अमर रहे, लाल बावटे की’ अशा गगनचुंबी घोषणांनी सारा परिसर भारुन गेला होता. दरम्यान, साश्रुनयनांनी मीनाक्षीताईंना अखेरचा निरोप देण्यात आला.


माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांच्या निधनाची माहिती वाऱ्यासारखी पसरली. प्रत्येक कार्यकर्त्याची पावले पेझारीला वळू लागली. अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील नाना पाटील हायस्कूलच्या प्रांगणात त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले. सकाळी सात वाजल्यापासून कार्यकर्ते, वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते मीनाक्षी पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी जमू लागले. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले. ताईंच्या अंत्यदर्शनासाठी सकाळपासूनच प्रचंड गर्दी झाली. नाना पाटील हायस्कूलचा परिसर कार्यकर्त्यांनी बहरून गेला होता. दुपारी दोननंतर अंत्ययात्रेला सुरुवात झाली.‌ ‘मीनाक्षीताई अमर रहे, लाल बावटे की जय’ अशा घोषणा देत अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रेत असंख्य नेते, कार्यकर्ते, कष्टकरी, शेतकरी, महिला मोठ्या संख्येने सहभाग झाल्या होत्या.

1 / 13

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, माजी खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री गणेश नाईक, माजी राज्यमंत्री तथा आमदार रवींद्र पाटील, महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आ. भरत गोगावले, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, आ. महेंद्र दळवी, माजी आ. धैर्यशील पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, माजी आ. अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा ॲड. निलीमा पाटील, कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील, प्रमोद पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, सांगोल्यातील शेकापचे नेते अनिकेत देशमुख, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, शिशीर धारकर, मिलिंद नार्वेकर, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के.ई. सुखदेवे, थळ येथील आरसीएफचे कार्यकारी संचालक अनिरुद्ध खाडीलकर, उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते बबन पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, नारायण डामसे, पिंट्या ठाकूर, जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य राजीव साबळे, चंद्रकांत कळंबे, अस्लम राऊत, ज्ञानदेव पवार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तालुका प्रमुख शंकर गुरव, अजित पाटील, खालापूरच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम, संतोष जंगम, आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, अध्यक्ष अभिजीत पाटील, नारायण वार्डे, जिल्हा परिषद माजी सदस्य बाळा तेलगे, अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगरसेवक ॲड. गौतम पाटील, वृषाली ठोसर, ॲड. नीलम हजारे, अनिल चोपडा, संजना कीर, काँग्रेसचे राज्य चिटणीस ॲड. प्रवीण ठाकूर, जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षा ॲड. श्रद्धा ठाकूर, ॲड. सचिन जोशी, व्यावसायिक केशव पुजारी, मिनीडोअर संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय पाटील, विजय गिदी, मनोज भगत, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद ठाकूर, माजी सदस्य अनिल गोमा पाटील आदी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्राबरोबरच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, पीएनपी एज्युकेशन सोसायटीचे सर्व कर्मचारी, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे पदाधिकारी, जिल्ह्यातील तालुका चिटणीस, सर्व सभासद, जिल्हा परिषद पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, जिल्हा परिषद, महसूल व पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी, पेझारीसह आजूबाजूच्या गावांमधील ग्रामस्थ, महिला, पाटील कुटुंबिय, नातेवाईक, सगेसोयरे मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व उपस्थितांनी मीनाक्षी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करीत आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, नीता पाटील, राजन पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, सुप्रिया पाटील, भावना पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद अर्थ सभापती चित्रा पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या भावना पाटील यांचे सांत्वन केले.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील स्मशानभूमीमध्ये मीनाक्षी पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या उपस्थितीत रायगड पोलिसांनी बंदुकीची सलामी दिली. त्यानंतर बिगुल वाजवित त्यांना मानवंदना देण्यात आले.
सोशल मीडियातून श्रद्धांजली
रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रात राजकारणाबरोबरच समाजाकारणात स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या मीनाक्षी पाटील यांच्या निधनाची माहिती मिळताच अनेकांनी शोक व्यक्त केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रुपमधून त्यांना श्रद्धांजलीचे मेसेज व्हायरल होऊ लागले.

चार दशकापूर्वी राजकारणात महिला सक्रिय नव्हत्या. अशा काळात मीनाक्षी पाटील यांनी समाजकारणासाठी राजकारणाचा वसा उचलला. प्रगल्भ अभ्यास, रोखठोक भूमिका, झुंजार नेतृत्वाच्या जोरावर तिने महाराष्ट्राच्या राजकारणात पाटील कुटूंबाचे नाव उंचावले. मोठी बहिण म्हणून कर्तव्य पार पाडत असतानाच तिने समाजहिताचे राजकारणही शिकविले. अभ्यास शिबिरात केलेल्या मार्गदर्शनामुळे तिने शेकापचे अनेक कार्यकर्ते घडविले. रायगड जिल्ह्याच्या विकासात तिचे योगदान उल्लेखनीय आहे. अलिबागच्या हिताचे अनेक मोठे निर्णय तिने घेतले. अर्थसंकल्पाबाबतही तिचा प्रचंड अभ्यास होता. मद्देसुद प्रश्न मांडणे, प्रसंगी मंत्र्यांनाही न घाबरता खडेबोल सूनावून जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम तिने केले. आपल्या वकृत्वाच्या जोरावर राजकारणात तिने एक वेगळी पक्कड निर्माण केली. पक्ष वाढीबरोबरच अलिबागच्या व रायगडच्या विकासामध्ये तिचे योगदान राहिले आहे. एक बहिण म्हणून कायमच ती पाठीशी राहिली. तळागाळातील घटकाला न्याय देण्याचे काम तिने केले आहे. मीनाक्षी पाटील यांच्या निधनाने मोठी हानी झाली आहे. तिने बहिणीबरोबरच आईची माया ही केली. आज तिच्या जाण्याने पोरकं झाल्यासारखे वाटत असून निर्माण झालेली पोकळी न भरुन निघणारी आहे.

आ. जयंत पाटील, शेकाप सरचिटणीस

मीनाक्षी पाटील यांच्या निधनामुळे रायगडसह संपुर्ण महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाले आहे. श्रमजीवी व कष्टकऱ्यांचा आवाज गेला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मृत्यूशी झुंज देत असतानादेखील कार्यकर्त्यांच्या त्या संपर्कात होत्या. पक्षाशी प्रामाणिक कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे मीनाक्षी पाटील. पक्ष आदेश मानणारे वेगळे व्यक्तीमत्व होते. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन केला. त्यांची आठवण संपुर्ण महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. एक लोकाभिमुख, अभ्यासू व्यक्तीमत्व होते.

माजी आ. पंडित पाटील

शेतकरी कामगार पक्षाच्या लढवय्या नेत्या मीनाक्षी पाटील यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक खंबीर नेतृत्व व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या नेत्या म्हणून आम्हा महिलांसाठी त्या कायमच आदर्शवत राहिल्या आहेत. प्रेमळ स्वभावाबरोबरच स्पष्टवक्त्या म्हणून त्यांची एक वेगळी ख्याती होती. अनेक विकासकामे करीत असताना त्यांनी कायमच कौतुकाची थाप दिली. वेळप्रसंगी खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांची आठवण कायमच स्मरणात राहणार असून, त्यांचा आदर्श घेत समाजाच्या हितासाठी काम करण्याचा प्रयत्न नक्की करेन.

चित्रलेखा पाटील, महिला आघाडी प्रमुख, शेकाप
Exit mobile version