| पनवेल | वार्ताहर |
साखळी पद्धत मार्केटिंग कंपनी स्थापन करून गुंतवणुकीवर तीन पट रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्याचा परतावा न देता एक कोटी एक लाख 47 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सुनील विश्वकर्मा, संतोष शिर्के, नाना राणे व केशव पावसकर यांच्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नीलम मुस्के या पनवेल, करंजाडे येथे राहत असून यांच्या ओळखीचे केशव पावस्कर यांनी साखळी पद्धत मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यांनी स्काय मंत्रा व स्काय एंजल नावाच्या मार्केटिंग कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. यावेळी वर्षभरात गुंतवणूक केलेल्या रकमेवर तीन पट परतावा मिळेल असे सांगितले. त्यानंतर त्यांनी कंपनीचे मालक सुनील विश्वकर्मा व संतोष शिर्के यांच्या बद्दल माहिती दिली आणि संतोष शिर्के यांच्यासोबत करंजाडे येथे भेट करून दिली आणि विश्वकर्मा यांच्यासोबत व्हिडिओ कॉल करून ओळख केली. प्रत्येकाने अधिक सदस्य जोडल्यास कंपनी जास्त परतावा देईल असे आश्वासन दिले व सदस्य जोडण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना कंपनी चांगली असल्याचे सांगून स्कीम बद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी पैशांची गुंतवणूक केली. त्यानंतर दागिने गहाण ठेवून कॉइनमध्ये गुंतवणूक केली. काही दिवसांनी कंपनीच्या अकाउंट मध्ये ऑडिटचा प्रॉब्लेम चालू असल्याचे पावसकर आणि शिर्के यांनी सांगितले. त्यानंतर फोन देखील घेतला नाही. काही दिवसांनी दोन्ही कंपन्या गुंतवणूकदारांना परतावा न देता बंद केल्याचे समजून आले. तब्बल 30 जणांचे एक कोटी एक लाख 47 हजार रुपये घेऊन परत न केल्याप्रकरणी चौघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.