। नवीन पनवेल । वार्ताहर ।
ऑनलाईन ट्रेडिंग गुंतवणुकीमध्ये नफा असल्याचे आम्ही दाखवून सात लाख सात हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार खारघरमध्ये उघडकीस आला आहे. आरोपी विरोधात खारघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खारघर, सेक्टर 21 येथील सरीथा बहार ह्या नेटवरून ट्रेडिंग कंपन्यांच्या संदर्भाने माहिती घेत होत्या. ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांना एका व्यक्तीने फोन केला व युके मधून बोलत असून त्यांची ट्रेडिंग कंपनी असल्याचे सांगितले. यावेळी पैसे गुंतवल्यास जास्त नफा होईल अशी माहिती दिली. त्यामुळे बहार यांनी सात लाख सात हजार रुपये गुंतवले. यावेळी पैशांचा नफा एका महिन्यानंतर खात्यावर दिसून येईल असे समोरील व्यक्ती माईक हे बोलत होते. बहरा याना त्यांच्या कंपनीच्या खात्यावर डॉलरवर रक्कम दाखवत असे. त्यानंतर काही दिवसांनी माईक याने बँक खात्यावर जमा होणार्या रकमेच्या वर आयआरबीने टॅक्स लावला आहे असे सांगून अधिकची रक्कम मागणी केली. व माइक हा त्यांना पैसे मागितल्यानंतर उडवाउडवीचे उत्तर देऊ लागला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बहार यांनी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.