मारेकर्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
उरण येथील 22 वर्षीय तरुणीची क्रूर हत्या केल्याप्रकरणी सकल हिंदू समाज अलिबागच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, वृषाली ठोसर, संजना कीर, अॅड. प्रवीण ठाकूर, काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्षा अॅड. श्रद्धा ठाकूर यांच्यासह सकल हिंदू समाज अलिबागचे निखील चव्हाण, कुलदीप कोळी, सिद्धेश तिवरेकर, स्वप्नील गाडे, तेजस ढवळे, करण वगळ, मानस कुंटे, वैभव पुरी, शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
रायगड जिल्ह्यातील उरण येथील घटना मानव जातीला काळीमा फासणारी आहे. नराधमाला फाशी देण्यात यावी, त्याच्याविरोधात पुरावे गोळा करून वेगवेगळी कलमे लावण्यात यावी, या मागणीसह बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यातील अधिकार्यांनी गांभीर्याने घेतली नाही. तातडीने त्याची कार्यवाही सुरू केली नाही. सीडीआर तपासला असता तर कदाचित तिचा ठावठिकाणा लागून जीव वाचला असता. निर्घृण हत्या करणार्या दाऊद शेखविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, त्याला फाशी देण्यात यावी, अशी मागणी सकल हिंदू समाज अलिबागच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून निषेध मोर्चाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान, यशश्री शिंदेला श्रद्धांजली अर्पण केली. या मोर्चात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यावर सभेत रुपांतर झाले. यावेळी जिल्हाधिकारी जावळे यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.









