राजकीय पक्ष, संघटना, मंडळ, वसाहतींकडून आयोजन
। माणगाव । वार्ताहर ।
आबालवृद्धांच्या आवडीचा, मनसोक्त बेधुंद नाचण्या, गाण्याचा उत्सव म्हणजे गोविंदा. बाळ गोपाळ आनंदाने मोठ्या उत्साहाने गोविंदाची वाट पाहत असतात. यावर्षी गुरुवारी दहीहंडी उत्सव असून दहीहंडीच्या आयोजनाची जय्यत तयारी शहरात, खेडोपाडी सुरू आहे.
गोविंदा जसा नाचण्या-गाण्याचा, धम्माल मस्ती करण्याचा उत्सव आहे, तसाच तो मनोरे अर्थात थरावर थर लावून दहीहंडी फोडण्याचा उत्सव आहे. दहीहंडीच्या निमित्ताने मनोरे लावून सहा ते सात थर लावून उंच उंच हंडी फोडण्याला महत्त्व दिले जाते. हे मनोरे लावणे दहीहंडी फोडणे हे साहसी प्रकारातील खेळ असून गोविंदाची तारीख जवळ आल्यामुळे तरुण-तरुणी, बाळ गोपाळ, वृद्ध, विविध मंडळे मनोरे रचण्याच्या सरावात गर्क होत आहेत. दैनंदिन कामे उरकून सायंकाळी, रात्री उघड्या मैदानावर, सार्वजनिक ठिकाणी मनोरे रचण्याचा सराव सुरू आहे.
आपल्या गावातील दहीहंडी फोडून, शेजारील गावातून, शहरातून स्पर्धा असलेल्या ठिकाणी गोविंदा पथक आपापली मनोऱ्याची कला दाखवतात. अगदी सहा ते सात थरांचे मनोरे लिलया लावून बक्षीस जिंकतात. अलीकडच्या काळात दहीहंडीच्या निमित्ताने विविध राजकीय पक्ष, संघटना,मंडळ, वसाहती चांगली बक्षीस लावून दहीहंडीचे आयोजन करतात. ठराविक उंचीच्या थराच्या मनोऱ्यांना बक्षीस देतात. त्यामुळे या उत्सवाला व्यावसायिक स्वरूप आले असून अनेक मंडळ आवड, साहस व कौशल्य दाखविण्यासाठी दहीहंडी उत्सवात मनोऱ्याची कला दाखवून सहभागी होतात.
गेल्या काही दिवसांपासून मनोरे रचण्याचा सराव सुरू आहे. दहीहंडी उत्सव जवळ आल्याने सरावाला अधिक महत्व देत आहोत. झटपट कृती, तोल सावरणे, सुरक्षेची काळजी घेणे या बाबींकडे लक्ष देऊन सुरक्षित व साहसी दहीहंडी उत्सव करण्याचा प्रयत्न करत आहोत.
जयेश पवार, स्वयंभु गोविंदा पथक विठ्ठलनगर