डाॅ. शिवाजी दाम यांच्या सहकार्याने फुलले मळे
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम मुंबईस्थित डॉ. शिवाजी दाम यांनी करून दिल्या आहेत. कर्जत आणि मुरबाड तालुक्यातील तब्बल 48 गावांमधील 650 शेतकरी यांना आर्थिक सहकार्य डॉ. दाम यांच्या संस्थेच्या माध्यमातून दिले जाते. या सहकार्यामुळे भाजीचे मळे फुलले असून पावसाळा सुरु झाला की, शेतकरी भाजीपाला शेती करू लागतात. सर्व प्रकारचा भाजीपाला पिकविण्यासाठी डॉ. दाम यांच्या फाऊंडेशनकडून खते आणि बियाणे उपलब्ध करून दिली जातात. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात समूहाने भाजीपाला शेती केली जाण्याचा प्रयोग गेली दहा वर्षे कर्जत तालुक्यात राबविला जात आहे.
एक दोन गावातून सुरु झालेली भाजीपाल्याची समूह शेतीचा प्रयोग यशस्वी होऊ लागला. ते पाहून अनेक शेतकरी डॉ. दाम यांच्याकडे भाजीपाला शेती करण्यासाठी बियाणे आणि खते घ्यायला येऊ लागले. मात्र शेती करताना त्या शेतकऱ्यांने खते आणि बियाणे यांचे मूळ रक्कम वर्षभरात भरणे आवश्यक होती. अपवाद वगळता बहुसंख्य शेतकरी यांनी भाजीपाला शेतीसाठी घेतलेल्या बियाणे आणि खते यांचे पैसे जमा करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना फाऊंडेशन कडून खरीप हंगाम सुरु होण्याच्या सुरुवातीला बियाणे आणि खते मिळू लागली. त्याचा फायदा शेतकरी उचलू लागले आणि तालुक्यातील नांदगाव, खांडस, ओलमन या तीन ग्रामपंचातीमधील 35 गावातील ग्रामस्थ हे भाजीपाला शेती करू लागले.
कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांबरोबर मुरबाड तालुक्यातील 15 गावातील असे मिळवून 48 गावातील शेतकरी भाजीपाला समूह शेती करीत आहेत. आज तब्बल 12500 एकर जमिनीवर हि समूह शेती केली जात असून पावसाळ्यातील चार महिने काकडी, वांगे, शिराळे, घोसाळे, खरबूज, कारले,भेंडी, रताळे पीके शेतकरी घेत आहेत.
कल्याण,पनवेल बाजारात विक्री हा सर्व भाजीपाला स्थानिक तेलंगवाडी, ओलमन, गोरेवाडी येथील तरुण आपल्या कंदील टेम्पो मधून शाईटातून उचलतात आणि विक्री साठी घेऊन जातात.
कुटुंबातील सदस्यांचे योगदान प्लास्टिक पिशवी आणि कॅरेट मध्ये हा भाजीपाला भरून ठेवण्यात येत असतो. बहुसंख्य शेतकरी हे आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या मदतीने भाजीपाला काढण्यासाठी मदत करीत असतात.