| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील रानसई ग्रामपंचायत हद्दीतील खैरकाठी या आदिवासी बांधवांच्या पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव असलेली हापसा (बोर) नादुरुस्त झाली होती. जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनिष पाटील यांनी त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने ती दुरुस्त करुन येथील बांधवाचा पिण्याचा प्रश्न सोडविला आहे.
यंदा उन्हाळा सुरू झाल्यापासून रानसई ग्रामपंचायत हद्दीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यात रानसई ग्रामपंचायती हद्दीतील दोन वाड्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव असलेली हापसा ही नादुरुस्त झाली होती. त्यामुळे येथील नागरिकांना महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी तासंतास थांबावे लागत होते. या बांधवांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील यांनी टँकरची व्यवस्था केली. परंतु, येथील नागरिकांना हक्काची असलेली हापसा दुरुस्त करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मंगळवारी (दि.19) डॉ. मनिष पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खैरकाठी येथे जाऊन हापसा खोलून दुरुस्त केली. यावेळी डॉ. मनीष पाटील यांच्यासह दत्ता पाटील, दिनकर पाटील, प्रतीक पाटील, परेश पाटील, मंगेश मोकल, उमेश भोईर तसेच आदिवासी बांधव उपस्थित होते.







