। मुंबई । वर्ताहार ।
भारतीय महिला संघाने न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकात आतापर्यंत दोन सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत.
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यासाठी भारतीय संघाच्या कामगिरीत सातत्य असणे आवश्यक असून संघात सतत बदल करणे त्यांनी टाळले पाहिजे, असे मत भारताच्या माजी कर्णधार डायना एडल्जी यांनी व्यक्त केले. तसेच गेल्या काही सामन्यांपासून चांगली कामगिरी करत असलेल्या हरमनप्रीत कौरने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे, असेही एडल्जी म्हणाल्या.
‘‘सलामीवीर स्मृती मानधना आणि हरमनप्रीत या दोघी लयीत असतात व त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला असतो, तेव्हा त्यांना एकत्रित अधिकाधिक षटके खेळण्याची संधी देणे गरजेचे आहे. त्या एकत्रित उत्तम फलंदाजी करतात आणि त्यांच्यात एक—दोन धावांच्या साहाय्याने धावफलक हलता ठेवण्याची क्षमता आहे. त्यामुळे हरमनप्रीतने तिसऱ्या क्रमांकावर खेळावे. मग दीप्ती शर्मा आणि कर्णधार मिताली राज अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर खेळू शकतील,’’ असे एडल्जी यांनी सांगितले.
भारतीय महिला संघाने न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकात आतापर्यंत दोन सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. भारताचा शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना होणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध झालेल्या पहिल्या दोन सामन्यांत डावखुऱ्याा दीप्तीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्यानंतर वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांत मिताली तिसऱ्या क्रमांकावर खेळली. मात्र, भारतीय संघाला कामगिरीत सातत्य राखायचे असल्यास फलंदाजांचा क्रम निश्चित असणे गरजेचे आहे, असे एडल्जी यांना वाटते.
‘‘कोणती खेळाडू कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार हे निश्चित असले पाहिजे. केवळ अखेरच्या २० षटकांत तुम्ही रिचा घोष आणि पूजा वस्त्रकार या फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांना बढती देऊ शकता,’’ असे एडल्जी यांनी नमूद केले.
मिताली, दीप्तीला सूर गवसेल —रंगास्वामी
मिताली (चार सामन्यांत ४६ धावा) आणि दीप्ती (चार सामन्यांत ६० धावा) या भारताच्या अनुभवी फलंदाज यंदाच्या महिला विश्व्चषकात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्या आहेत. मात्र, त्यांना लवकरच सूर गवसेल याची भारताच्या माजी कर्णधार शांता रंगास्वामी यांना खात्री आहे. ‘‘विश्व्चषकापूर्वी मिताली आणि दीप्ती या दोघीही चांगली कामगिरी करत होत्या. त्यांना लवकरच पुन्हा सूर गवसेल. विशेषत: मिताली ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी करेल अशी आशा आहे,’’ असे रंगास्वामी म्हणाल्या.