श्रीवर्धन तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर

आंबा बागायतदारांचे प्रचंड नुकसान; तात्काळ नुकसान भरपाईची जोरदार मागणी

। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, अक्षरशः थैमान घालत आंबा बागायतदारांना उद्ध्वस्त केले आहे. आधीच दुष्काळाच्या झळा सहन करत कसाबसा हंगाम सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांवर या अवेळी आलेल्या पावसाने दुहेरी नव्हे तर तिहेरी संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर वर्षभराची मेहनत काही तासांत मातीमोल झाली आहे.

हंगामाच्या सुरुवातीलाच आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात गळून पडला होता. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार हे स्पष्ट झाले होते. त्यातच आता अवकाळी पावसाच्या तडाख्याने उरलेसुरले फळही झोडपून काढले आहे. अनेक बागांमध्ये झाडांवरील आंबे मोठ्या प्रमाणात गळून पडले असून, काही ठिकाणी झाडांचेही नुकसान झाले आहे. बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांचे आर्थिक कंबरडे अक्षरशः मोडले आहे.

तापलेल्या धरतीला या पावसाने दिलासा दिला असला, तरी आंबा उत्पादकांसाठी हा पाऊस विनाशकारी ठरला आहे. कर्ज काढून, प्रचंड खर्च करून जोपासलेल्या बागा आज उद्ध्वस्त झाल्या आहेत. “दुष्काळात तेरावा महिना” ही म्हण सध्या श्रीवर्धन तालुक्यातील बागायतदारांच्या बाबतीत अक्षरशः खरी ठरत आहे. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सरकारकडे तात्काळ मदतीची जोरदार मागणी केली आहे. नुकसानग्रस्त भागांचे त्वरित पंचनामे करून योग्य आणि भरघोस नुकसानभरपाई जाहीर करावी, कर्जमाफी द्यावी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा शेतकऱ्यांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही बागायतदारांनी दिला आहे.

दरम्यान, हवामानातील सतत होत असलेले बदल आणि अवकाळी पावसाचे वाढते प्रमाण यामुळे शेती व्यवसाय पूर्णपणे अस्थिर झाला आहे. विशेषतः आंबा बागायतदारांसाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरजही आता प्रकर्षाने समोर येत आहे.

“या अवकाळी पावसाने आमचं प्रचंड नुकसान केलं आहे. आधीच मोहर गळून उत्पादन घटलं होतं, त्यात उरलेले आंबेही मोठ्या प्रमाणात खाली पडले. वर्षभर कष्ट करून, कर्ज काढून बाग सांभाळली, पण काही तासांच्या पावसाने सगळं उद्ध्वस्त झालं. आता पुढचा हंगाम कसा काढायचा हा मोठा प्रश्न आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून आम्हाला योग्य नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आमच्यासारख्या बागायतदारांना जगणं कठीण होईल.”

संकेत हुमणे,
आंबा बागायतदार, बाणगंगा-श्रीवर्धन
Exit mobile version