एकाच डावात झळकावले तीन शतक
। चत्तोग्राम । वृत्तसंस्था ।
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी चत्तोग्राम कसोटीत धावांचा पाऊस पाडला आहे. टॉनी डी झॉर्जी (177), त्रिस्तान स्तब्स (106) व वियान मुल्डर (105) यांच्या शतकाच्या जोरावर आफ्रिकेने दुसर्या कसोटीत बांगलादेशविरुद्ध पहिला डाव 6 बाद 575 धावांवर घोषित केला. दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी इतिहासात आशिया खंडात एकाच डावात तीन शतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
कर्णधार एडन मार्कराम (33) माघारी परतल्यानंतर झॉर्जी व स्तब्स यांनी 201 धावांची भागीदारी केली. झॉर्जीने 269 चेंडूंत 12 चौकार व 4 षटकारांसह 177 धावा केल्या, तर स्तब्सने 198 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 106 धावांसह पहिले कसोटी शतक झळकावले. डेव्हिड वेडिंगहॅमच्या 59 धावांच्या खेळीने झॉर्जीला साथ मिळाली. पण, रायन रिकेल्टन (12) व कायले वेरेने (0) यांच्या अपयशाने बांगलादेशला सामन्यात पुनरागमनाची संधी दिली. मात्र, वियान व सेनुरन मुथ्थूस्वामी यांनी 7 व्या बळीसाठी 152 धावांची भागीदारी केली. वियानने 150 चेंडूंत 8 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 105 धावा केल्या. मुथ्थूस्वामीने 75 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 68 धावांची नाबाद खेळी केली. आफ्रिकेने 6 बाद 575 धावांवर डाव घोषित केला.