क्षेत्ररक्षक, यष्टिरक्षक, फलंदाजाला हेल्मेटची सक्ती
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
क्षेत्ररक्षक, यष्टिरक्षक आणि फलंदाज यांनाही आता हेल्मेट घालण्याची सक्ती करण्याचा नियम आयसीसीने केला असून, 1 जूनपासून तो अंमलात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षक फलंदाजांच्या जवळ उभे असतात, यष्टिरक्षक स्टम्पजवळ उभा असतो आणि फलंदाज वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजी करत असताना हेल्मेटची सक्ती असेल, असा नियम करण्यात आला आहे. हे नवीन नियम इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात 1 जूनपासून इंग्लंडमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणाऱ्या कसोटी सामन्यापासून लागू होणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जून रोजी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्येही नवीन नियमांचा वापर केला जाईल, असेही आयसीसीकडून सांगण्यात आले.
फ्री हिटच्या नियमात बदल
फ्री हिटच्या नियमातही मोठा बदल करण्यात आला आहे. आता फ्री हिटवर चेंडू विकेटवर आदळला आणि फलंदाजाने धाव घेतली, तर तो अतिरिक्त धावांच्या खात्यात नाही तर फलंदाजाच्या खात्यात जमा होईल. जर गोलंदाजाने नो बॉल टाकला तर पुढचा चेंडू फ्री हिट असेल. आता फलंदाजाला तो फ्री हिट बॉल मारता आला नाही आणि बॉल टाकला, पण त्याने एक धाव घेतली तर ही त्याच्या नावे नोंद होईल.