नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर प्रथम कोकणात जन आशीर्वाद यात्रा काढली. या यात्रेत विविध ठिकाणी राज्य सरकारविरोधात वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या चौथ्या दिवशी महाड येथील पत्रकार परिषदेत बोलत असताना नारायण राणे यांनी चुकीचे वक्तव्य केले. देशाच्या स्वातंत्र्याची मुख्यमंत्र्यांना माहिती नसावी, ही लाजिरवाणी बाब आहे. मी त्या ठिकाणी असतो तर कानाखाली दिली असती, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले. या टिकेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. पोलादपूर तालुक्यातील शिवसैनिकांनी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन करीत निषेध नोंदविला. याबाबत जर आधी माहित असते तर पोलादपूर तालुक्यातून भाजपची रथयात्रा जाण्यापूर्वी नारायण राणे यांची प्रेतयात्रा पाठविली असती, असे मत पोलादपूर तालुक्यातील शिवसैनिकांनी व्यक्त केले आहे.