बटलर-हेल्सच्या तुफानापुढे गोलंदाजी निष्प्रभ
| सिडनी | वृत्तसंस्था |
भारत आणि इंग्लंडदरम्यान दुसर्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा लाजिरवाणा पराभव करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला. भारतीय संघाने उभारलेल्या 168 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्सच्या तुफानी वादळाने भारताची दाणादाण उडवित तब्बल 10 गडी राखून दारूण पराभव केला. या पराभवामुळे भारताचे दुसर्यांदा टी20 विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले. जॉस बटलरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांनी यावेळी भारताच्या गोलंदाजीवर प्रहार केला. त्यामुळेच भारताच्या हातून यावेळी सामना निसटला. अॅलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांनी अर्धशतक झळकावली, त्याचबरोबर शतकी भागीदारी केली आणि इंग्लंडला विजय मिळवून दिला. या दोघांनी आपली विकेट न देता भारतावर दमदार विजय साकारला. फलंदाजांनी उभारलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडसाठी कर्णधार जोस बटलर व अॅलेक्स हेल्स यांनी सुरुवात केली. बटलरने पहिल्या षटकात तीन चौकार ठोकत आपले इरादे जाहीर केले. त्यानंतर दुसर्या बाजूने ऍलेक्स हेल्सने आक्रमण केले. दोघांनीदेखील भारतीय गोलंदाजांची पिसे काढत आपापली अर्धशतके पूर्ण केली. त्यांनी संयम व आक्रमण यांचा सुरेख मेळ साधत विजय इंग्लंडच्या बाजूने नेला. बटलरने नाबाद 80, तर हेल्सने 86 धावा करत इंग्लंडला दहा गड्यांनी विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी संधी मिळालेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. राहुल केवळ पाच धावा काढून माघारी परतला. कर्णधार रोहित जम बसल्यानंतर 27 तर सूर्यकुमार यादव 14 धावा करून बाद झाले. एका बाजूने शानदार पद्धतीने खेळत असलेल्या विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतक पूर्ण करताच तो तंबूत परतला. त्यानंतर हार्दिक पंड्याने भारतीय डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. सुरुवातीला अंदाज घेतल्यानंतर त्याने अखेरच्या चार षटकात अक्षरशः इंग्लिश गोलंदाजांची धुलाई केली. अखेरच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी त्याने 4 चौकार व 5 षटकारांसह 33 चेंडूवर 63 धावा केल्या. त्याच्या या आक्रमक खेळीमुळे भारतीय संघ 6 बाद 168 अशी मजल मारू शकला. एका बाजूने शानदार पद्धतीने खेळत असलेल्या विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे स्पर्धेतील चौथे अर्धशतक ठरले. तसेच यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 4000 धावांचा टप्पा पूर्ण केला. त्याने 50 धावांची खेळी केली. यामध्ये 4 चौकार व एका षटकाराचा समावेश होता.