आतापर्यंत 117 जणांनी गमावला जीव
| आगरदांडा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील काशिद समुद्रात आतापर्यंत 117 जणांना जीव गमवावा लागला आहे. या ठिकाणच्या पाण्याचा अंदाज पोहणाऱ्यांना येत नाही. त्यामुळे त्यांना जलसमाधी मिळत आहे. समुद्र स्नानासाठी येणाऱ्या पर्यटकांनी सूचनांचे पालन करावे आणि आपला लाखमोलाचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
काशिदचा समुद्राकिनारा पर्यटनाच्या नकाशावर झळकत आहे. या ठिकाणी देश-विदेशातील लाखो पर्यटक येत असतात. पर्यटकांना समुद्र स्नानाचा आणि समुद्र सफरीचा मोह आवरता येत नाही. काशिद समुद्राची नैसर्गिक रचना अन्य ठिकाणच्या समुद्राकिनाऱ्या सारखी नाही. या ठिकाणी सुरुवातीला वाळु नंतर खोलगट भाग येतो. त्यामध्ये खडकाळ भाग असल्याने पर्यटकांना पोहताना अंदाज येत नाही. त्यामुळेच पर्यटकांना पाण्याचा अंदाज येत नाही.
गेल्या काही वर्षात या ठिकाणी अपघात होत असल्याने हा समुद्र पोहण्यासाठी धोकादायक बनला आहे. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील हडपसर येथील 21 वर्षीय तरुण जुनेद अतिक शेख याला समुद्रात पोहताना आपला जीव गमावावा लागला. आतापर्यंत तालुक्यातील समुद्राकिनारी पोहत असताना 143 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. पैकी 117 जण हे काशिद समुद्रात बुडाले आहेत. प्रशासन पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाय योजना करत नसल्याने पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. प्रशासनाने आतापासूनच कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा मुरुडकडे पर्यटक पाठ फिरवतील. त्याचा विपरीत परिणाम स्थानिकांच्या रोजगारावर होणार आहे.
सहली समुद्राकिनारी येताच त्याच्या गाडीचे नंबर, शाळा, महाविद्यालय, संस्थेचे नाव, विद्यार्थी संख्या, शिक्षक, जिल्ह्याचे नाव आदी माहिती रजिस्टरमध्ये नोंद करण्यात यावी, धोक्याचा इशारा म्हणून सायरनचा इशारा वेळोवेळी देण्यात यावा , लाऊड स्पीकरद्वारे पर्यटक अथवा शालेय विद्यार्थी शिक्षक यांना समुद्राच्या पाण्यात जाऊ नये याबाबत सूचना देण्यात याव्यात, वयोवृध्द व्यक्ती, महिला, बालके हे गर्दी ठिकाणी हरवल्यास त्यांना लाऊस्पिकरच्या साह्याने जलद माहिती देता येईल अशी तरतूद करण्यात यावी, सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, जीवरक्षकांची संख्या वाढवण्यात यावी, रेसस्क्यू बोटींची संख्या वाढवण्यात यावी, पोहतेवेळी पर्यटकांनसाठी बॉल, रिंग बॉय, रस्सी, लाईफ जॅकेट आदी साधनसामुग्री पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात यावी.