। छत्रपती संभाजीनगर । प्रतिनिधी ।
कन्नड तालुक्यातील करंजखेड येथे चाकूचा धाक दाखवून एका मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. या टोळीतील सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील चाकूही जप्त केला आहे.
सरफराज रऊफ शहा (26, रा. करंजखेडा, ता. कन्नड) यांचे एक वर्षापूर्वी घरासमोरील महिलेसोबत काही कारणावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला होता. हे प्रकरण आपसात मिटलेही होते. मात्र, या प्रकरणातील महिलेच्या नातेवाईकांनी या रागातून, शुक्रवारी दुपारी सरफराज रऊफ शहा व त्याचा भाऊ आवेश दुचाकीने नमाजासाठी मशिदीत जात असताना, सहा जणांनी इरटिगा गाडीने रस्ता अडवून, त्यांना चाकूचा धाक दाखवून धमकावले. तसेच, मारहाण करून जबरदस्तीने कारमध्ये टाकून अपहरण केले.
पिशोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजीराव नागवे यांना ही माहिती मिळताच त्यांनी ही माहिती चौकीचे बीट अमलदार पो.हे. पंढरीनाथ इंगळे यांना दिली. पोलीस ठाण्यातील लेखनिक विलास सोनवणे, जमादार वसंत पाटील, गणेश कवाळ, चालक गजानन कऱ्हाळे व करण म्हस्के यांना दुपारी एक वाजताच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या इरटिगा कारमधील लोकांनी करंजखेडा येथून एका तरुणाला चाकूचा धाक दाखवून अपहरण केले आहे व ती कार साखरवेल फाटयाकडे येत असल्याची माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ साखरवेल फाट्यावर नाकाबंदी केली आणि इरटिगा गाडी थांबवून सरफराजची सुटका केली. तसेच, या सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक चाकूही जप्त केला आहे. याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.