महिनाभरापासून नळांना पाणी नाही; पाण्यासाठी ग्रामस्थ व महिला आक्रमक
। अलिबाग । प्रतिनिधी ।
चिंचोटी गावात जलजीवन योजना राबवूनदेखील गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गेल्या महिन्याभरापासून गावात पाणी नसल्याने ग्रामस्थांसह महिलांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली. गुरुवारी (दि.27) दुपारी गावात पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ व महिलांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अधिकार्यांना धारेवर धरत महिला आक्रमक झाल्या होत्या. तात्काळ पाणीपुरवठा सुरु करण्याची मागणी जोर धरत होती. अखेर प्रशासनाने पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर ही बैठक पार पडली.
यावेळी उपअभियंता नेहाल चवरकर, गावातील पंच, महिला, ग्रामस्थ व तरुण मंडळी उपस्थित होती. अलिबाग तालुक्यातील चिंचोटीमध्ये जलजीवन योजना राबविण्यात आली आहे. या योजनेसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आली. जुन्या राष्ट्रीय पेयजल योजनेला जोडूनच ही योजना राबविण्यात आली. त्यामुळे जुन्या योजनेमार्फत मिळणारे पाणीदेखील मिळणे बंद झाले. जलजीवन योजनेतून पाण्याचा आधार मिळेल, अशी आशा चिंचोटी ग्रामस्थांना होती. मात्र, गेल्या महिन्याभरापासून येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. अनेक वेळा गावात बैठका घेऊन पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायत प्रशासनाकडूनदेखील दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. अखेर गुरुवारी दुपारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता नेहाल चवरकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थ व महिलांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्रामस्थांचे गार्हाणे ऐकून घेण्यात आले. ग्रामस्थ व महिलांनी अधिकार्यांवर प्रश्नाचा भडीमार करीत पिण्यासाठी पाणी कधी द्याल, असा सवाल उपस्थित केला. अखेर हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. लवकरच पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन अधिकार्यांकडून देण्यात आले. त्यानंतर ही बैठक पार पडली.
पाणीपट्टी भरण्यास ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष?
ग्रामपंचायतीमध्ये पाणीपट्टी भरण्यास ग्रामस्थ सकारात्मक आहेत. मात्र, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून पाणीपट्टी भरण्यास दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी अनेक ग्रामस्थांनी केला. पावती नसल्याचे कारण सांगून पाणीपट्टी भरणे लांबणीवर ठेवल्याबाबत ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कारभाराबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रीय पेयजल योजनेमार्फत गावात पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या आहेत. जलजीवन योजनेचे नळ कनेक्शन जोडणीचे काम पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा केला जाईल. याबाबत ग्रामस्थांसमवेत चर्चा झाली आहे.
नेहाल चवरकर,
उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, अलिबाग