| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
खारघर परिसरातील एका आरोग्य केंद्रामध्ये अस्वच्छता आणि अव्यवस्थेचा प्रकार समोर आल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या केंद्रात स्वच्छतागृहाच्या समोरच औषधांचा साठा ठेवण्यात आल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्वच्छतागृहाजवळ औषध ठेवल्यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
खारघर सेक्टर 12 येथील आरोग्यवर्धिनी केंद्रातील आपला दवाखान्यात महालॅबच्या माध्यमातून विविध प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या जातात. आरोग्य केंद्र हे स्वच्छ आणि सुरक्षित असणे अत्यंत गरजेचे असताना येथे मूलभूत स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्वच्छतागृहाजवळ औषध ठेवल्याचे दिसून येते. यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो तसेच औषधांची गुणवत्तादेखील बाधित होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये आरोग्य केंद्रात एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे व्हिडिओमधून दिसून येत आहे.
यासंदर्भात खारघरमधील खासगी रुग्णालयातील डॉक्टरशी संपर्क केला असता, स्वच्छतागृहासमोर औषध ठेवू नये. या प्रकारामुळे आरोग्यसेवांबाबत नागरिकांचा विश्वास डळमळीत होतो. आम्ही डॉक्टर असल्यामुळे पालिकेच्या विरोधात बोलता येत नसल्याचे सांगितले. सेक्टर 15 येथील आरोग्य केंद्रात रुग्ण तपासणीसाठी असलेल्या बेडवर वैद्यकीय साहित्य आणि इतर सामान अस्ताव्यस्त ठेवलेले दिसून आले. यामुळे रुग्णांना उपचार घेताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या बेडचा उपयोग औषध-गोळ्या आणि दस्तऐवज ठेवण्यासाठी केला जात असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, रुग्ण तपासणीसाठी बेड आहेत की साहित्य ठेवण्यासाठी, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.






